प्रदीप कापसे, Tv9 मराठी, पुणे | 24 नोव्हेंबर 2023 : पुण्यातून एक धक्कादायक बातमी समोर आली आहे. पती-पत्नीमध्ये वाद होणं हे सर्वसामान्य आहे. एका घरात वास्तव्यास असताना भांड्याला भांडं लागू शकतं. याशिवाय पती-पत्नीत वाद झाला तरी तो तात्पुरता असतो. उलट भांडणामुळे पती-पत्नीमधील प्रेम वाढतं, असं बोललं जातं. याशिवाय भांडणानंतर पती-पत्नीमध्ये लटका राग असतो. तो राग नंतर संवादातून निघून जातो. पण आपण आपल्या रागावर नियंत्रण मिळवायला हवा. आपल्या माणसांची जाणीव ठेवायला हवी. आपल्या कुटुंबियांना जपायला हवं. त्यांचा जीव जाईल किंवा त्यांना इजा पोहोचेल इतका वाद घालू नये, तसेच रागही धरु नये. कारण त्यानंतर पश्चात्तापाशिवाय दुसरं काहीच शिल्लक राहणार नाही. पुण्यात तशीच एक घटना घडली आहे. या घटनेत पती-पत्नीमध्ये झालेल्या वादात पतीचा मृत्यू झालाय.
संबंधित घटना ही पुण्यातील वानवडी परिसरातील घडली आहे. पती-पत्नीमध्ये फिरायला जाण्यावरुन वाद होतो. हा वाद इतका टोकाला गेला की पत्नीने वादातून आपल्या पतीच्या नाकावर ठोसा दिला. यामुळे पतीचा मृत्यू झाला. वाढदिवसाला फिरायला का नेलं नाही? यावरून वाद झाला होता. या वादात पत्नीने आपल्या पतीला केलेल्या मारहाणीत त्याचा मृत्यू झालाय.
वानवडी पोलीस ठाण्याच्या वरिष्ठ पोलीस निरीक्षक संजय पतंगे यांनी या घटनेवर प्रतिक्रिया दिली. “वानवडी पोलीस ठाणे हद्दीत निखिल खन्ना आणि रेणुका खन्ना हे दोन्ही राहतात. त्यांच्याबरोबर सासू-सासरे देखील राहतात. दुपारी सासू-सासरे कामानिमित्त बाहेर गेले होते. यावेळी निखिल आणि रेणुका यांच्यात वाढदिवसाला गिफ्ट दिलं नाही, लग्नाच्या वाढदिवशी गिफ्ट दिलं नाही, दिल्लीला भावाच्या मुलीच्या वाढदिवसालादेखील जाण्याबाबत सकारात्मक प्रतिसाद दिला नाही. त्यामुळे त्यांच्यात खडके उडाले”, असं वरिष्ठ पोलीस निरीक्षक संजय पतंगे म्हणाले.
“निखिल आणि रेणुका या दोघांमध्ये आज (24 नोव्हेंबर) दुपारी दीड वाजेच्या सुमारास याच मु्द्यावरुन भांडण झालं. या भांडणात रेणुका यांनी निखिल यांच्या तोंडावर ठोसे मारले. त्यामध्ये निखिल यांच्या नाकाचे हाड फ्रॅक्चर झालं आहे. दात तुटले आहेत. प्रचंड रक्तस्त्राव झाला. याची माहिती आम्हालाा मिळाल्यानंतर आम्ही तातडीने घटनास्थळी गेलो. अगोदर निखिल यांना तातडीने उपचाराची आवश्यकता असल्याने त्यांना तातडीने ससून रुग्णालयात नेलं. त्यांच्यावर उपचार सुरु होते. डॉक्टरांनी त्यांना मृत घोषित केलं”, असं पोलीस निरीक्षक संजय पतंगे यांनी सांगितलं.