राहुल ढवळे, टीव्ही 9 मराठी, दौंड (पुणे) : गोवा एक्स्प्रेसमध्ये पिण्याच्या पाण्यावरुन झालेल्या किरकोळ वादातून एका युवकाला धावत्या रेल्वेतून बाहेर फेकून दिल्याचा धक्कादायक प्रकार उघडकीस आला आहे. यामध्येच 33 वर्षीय प्रवासी गजानन राठोड याचा जागीच मृत्यू झाला. ही घटना दौंड रेल्वेच्या हद्दीत घडली असून या प्रकरणी एकाला अटक करण्यात आली आहे. (Man Dies after thrown out of running Manmad Pune Goa Express at Daund)
पिण्याचे पाणी मागितल्याने वाद
मनमाडकडून पुण्याकडे जाणारी गोवा एक्स्प्रेस उशीरा धावत असल्यामुळे पहाटे चार वाजण्याच्या सुमारास रेल्वे दौंड रेल्वे स्टेशनला आली. गजानन राठोड याने नितीन जाधवकडे पिण्यासाठी बाटलीतील पाणी मागितले. मात्र नितीनने पाणी दिले नाही. या किरकोळ कारणावरुन गजानने नितीनच्या कानफटात मारली. यावरून दोघांमध्ये वाद सुरू झाला.
धावत्या ट्रेनमधून खाली फेकले
केडगाव स्टेशन येण्याच्या अगोदर गजाननला नितीनने रेल्वे डब्यातील स्वच्छतागृहाजवळ आणले आणि धावत्या गाडीतून त्याला खाली ढकलून दिल्याची माहिती पोलिसांनी दिली. या प्रकरणी आरोपी नितीन जाधवला पोलिसांनी अटक केली आहे.
मोबाईल चोराशी झटापटीत विवाहितेचा मृत्यू
दुसरीकडे, मध्य रेल्वेवरील कळवा आणि मुंब्रा रेल्वे स्थानकादरम्यान मोबाईल चोरासोबत झालेल्या झटापटीत लोकलखाली येऊन काही दिवसांपूर्वीच 35 वर्षीय विवाहितेचा मृत्यू झाला होता. डोंबिवली येथे राहणाऱ्या विद्या पाटील या अंधेरीमध्ये एका खासगी कंपनीत नोकरी करत होत्या. त्यांनी कुर्ला रेल्वे स्थानकातून डोंबिवलीला जाण्यासाठी लोकल पकडली. त्यावेळी त्यांच्या महिला डब्यामध्ये केवळ पाच ते सहा महिला प्रवासी होत्या.
नेमकं काय घडलं
लोकल कळवा रेल्वे स्थानकात आली असता, एक चोरटा डब्यात शिरला. चोराने विद्या यांच्या हातात असलेला मोबाईल खेचला. विद्या यांनी त्याला प्रतिकारही केला. या झटापटीमध्ये चोरट्याने त्यांना हिसका दिला. त्यामुळे त्या धावत्या रेल्वेगाडीखाली फेकल्या गेल्या. यात त्यांचा मृत्यू झाला.
संबंधित बातम्या :
धावत्या रेल्वेमध्ये बाथरुम 5 वर्षांचा मुलगा अडकला, आरपीएफ जवानांनी सुटका करण्यासाठी काय केलं?
मोबाईल चोरासोबत झटापट, लोकलखाली येऊन ठाण्यात विवाहितेचा मृत्यू, आरोपीला अखेर अटक
(Man Dies after thrown out of running Manmad Pune Goa Express at Daund)