पुणे: पुण्यातून एक अत्यंत धक्कादायक बातमी येत आहे. पुण्यातील राष्ट्रवादीचे एक आमदार सेक्सटॉर्शनचे बळी ठरल्याचं समोर आलं आहे. राष्ट्रवादीच्या या आमदाराला व्हिडीओ कॉल करून भुरळ घालण्याचा प्रयत्न केला. त्यानंतर त्यांना खंडणी मागण्यात आली. याप्रकरणी राजस्थानातून आरोपीला अटक करण्यात आली आहे. या प्रकरणी पोलीस अधिक तपास करत असून अजून कोण कोण सेक्सटॉर्शनचे बळी पडलेत याची माहिती घेत आहे.
राष्ट्रवादीचे मोहोळचे आमदार यशवंत माने यांनना सेक्सटॉर्शनच्या जाळ्यात ओढण्यात आलं आहे. आरोपीने आधी सोशल मीडियाच्या माध्यमातून आमदार यशवंत माने यांचा नंबर मिळवला. त्यानंतर त्यांना अश्लील मेसेज पाठवण्यास सुरुवात केली.
नंतर व्हिडीओ कॉल करून माने यांना भुरळ पाडण्याचा प्रयत्न केला. त्यानंतर आमदार माने यांच्याकडे 1 लाख रुपयांच्या खंडणीची मागणी केली. तसेच खंडणी न दिल्यास सोशल मीडियावर अश्लील व्हिडीओ व्हायरल करण्याची धमकी देण्यात आली.
आपल्याला ब्लॅकमेल करण्यात येत असल्याचं लक्षात आल्यानंतर आमदार माने यांनी पोलिसांकडे या प्रकाराची तक्रार केली. त्यानंतर पुणे सायबर पोलिसांनी या प्रकरणाची कसून तपास केला. पुणे सायबर पोलिसांनी या प्रकरणी आमदार माने यांना सेक्सटॉर्शनच्या जाळ्यात ओढणाऱ्या रिझवान अस्लम खान याला अटक केली. पोलिसांनी त्याला राजस्थानातील भरतपूर येथून अटक केली आहे.
पोलिसांनी रिझवान अस्लम खान याच्याकडून 4 मोबाईल, 4 सीमकार्ड जप्त केले आहेत. जप्त करण्यात आलेल्या मोबाईलमध्ये पोलिसांना 90 अश्लील व्हिडीओ सापडले आहेत. पोलिसांनी या प्रकरणी गुन्हा दाखल करून रिझवान याला पुणे न्यायालयात हजर केले.
कोर्टाने रिझवानला पाच दिवसांची पोलीस कोठडी सुनावली आहे. या प्रकरणी पोलीस अधिक तपास करत आहेत, अशी माहिती पुण्याचे अप्पर पोलीस आयुक्त रामनाथ पोकळे यांनी दिली.
केंब्रिज डिक्शनरीच्या मते, सेक्सटॉर्शनचा अर्थ कुणाला काही तरी करण्यास भाग पाडणे. विशेष करून यौनसंबंधी काम करण्यास भाग पाडणे. यात नग्न फोटो व्हायरल करून धमकी देणे, न्यूड व्हिडीओ व्हायरल करण्याची धमकी देणे आदी प्रकारांचा समावेश आहे.
एखाद्या व्यक्तीच्या खासगी आयुष्याबाबतची माहिती लिक करण्याची धमकी देण्याचा हा एक प्रकारचा गुन्हा आहे. पैशासाठी या सर्व गोष्टी केल्या जातात. किंवा सेक्शुअल डिमांड पूर्ण करण्यासाठी या धमक्या दिल्या जातात.
साध्या सोप्या भाषेत सांगायचं म्हणजे एखाद्या व्यक्तीचे प्रायव्हेट कंटेट व्हायरल करण्याची धमकी देणे आणि त्याबदल्यात काही तरी मिळवणे म्हणजेच सेक्सटॉर्शन होय.
एखाद्याचे प्रायव्हेट व्हिडीओ किंवा फोटो दुसऱ्यांना पाठवण्याच्या नावाने ब्लॅकमेल करणे हे सुद्धा सेक्सटॉर्शनच आहे. अत्यंत कमी वेळात अधिक पैसा मिळवण्यासाठी काही गुन्हेगार या मार्गाचा अवलंब करत असतात.