पुणे शहरात स्पर्धा परीक्षेच्या तयारीसाठी राज्यभरातून विद्यार्थी येत असतात. सरकारी अधिकारी होण्यासाठी ते रात्रंदिवस अभ्यास करत असतात. पुण्यात विदर्भातील वाशिम जिल्ह्यातून अभिलाषा मित्तल (27) स्पर्धा परीक्षेच्या तयारीसाठी आली होती. ७ एप्रिल रोजी तिने आपले जीवन संपवले. खोलीचा दरवाजा आतून बंद करुन तिने गळफास घेतला होता. या प्रकरणात खडक पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल झाला होता. त्यानंतर त्या तरुणीच्या मृतदेहाचे शवविच्छेदन केल्यावर तिच्या अंगावर मारहाणीच्या खुणा होत्या. यामुळे संशय निर्माण झाला होता. अखेर या प्रकरणाचा उलगडा झाला आहे. वसतिगृह चालकास आत्महत्या करण्यास प्रवृत्त केल्याबद्दल अटक करण्यात आली आहे.
अभिलाषा मित्तल ही वाशिम जिल्ह्यातील होती. गेल्याच महिन्यात ती स्पर्धा परीक्षेची तयारी करण्यासाठी पुण्यात आली होती. पुणे शहरात गुरुवार पेठ असणाऱ्या एका मुलींच्या हॉस्टेलमध्ये ती राहत होती. ७ एप्रिल रोजी तिने तिचे जीवन संपवल्याचा प्रकार समोर आला. खोलीमध्ये एकटी असताना तिने आतून बंद करुन गळफास घेतला होता. गुरुवार पेठ येथे डिपॉजिटचे पैसे मागितले म्हणून वसतिगृह चालकाने मारहाण केली होती. सुनील परमेश्वर महानोर असे अटक करण्यात आलेल्या वसतिगृह चालकाचे नाव आहे.
अभिलाषा मित्तल हिने छत्रपती संभाजीनगर येथील एमएससीचे शिक्षण घेतले होते. तिला सुनील महानोर याने मारहाण केल्यानंतर ती रडत खोलीमध्ये गेली होती. त्यानंतर तिने खोलीच्या दरवाजा लावून घेतला होता. अभिलाषा हिने तिचे वडील महेंद्र मित्तल यांना हॉस्टेल बदलायचे असल्याचे फोनवर सांगितले होते. परंतु ती जीवन संपवले, असा विचार कोणाच्या मनात आला. या प्रकरणी मुलीच्या वडिलांनी खडक पोलिसात तक्रार दिली होती. अधिक तपास खडक पोलीस करत होते.
गेल्या काही महिन्यांपासून पुण्यात एमपीएससीचा अभ्यास करणाऱ्या मुलींबाबत वेगवेगळे प्रकार घडत आहेत. एमपीएससी परीक्षा उत्तीर्ण झालेल्या दर्शना पवार हिचा तिच्या मित्रानेच काही महिन्यांपूर्वी खून केला होता.