देशात सर्वत्र लोकसभा निवडणुकीची रणधुमाळी सुरु आहे. त्याचवेळी राष्ट्रीय तपास संस्थेचे पथक पुणे शहरात दाखल झाले आहे. राष्ट्रीय तपास संस्था (एनआयए) आणि महाराष्ट्र एटीएसच्या पथकाने शनिवारी पहाटे पुणे शहरात कारवाई केली. या कारवाईमुळे खळबळ माजली आहे. दहशतवाद्याच्या चौकशीतून मिळालेल्या माहितीनुसार एनआयएने ही कारवाई केली. या दहशतवाद्यांनी पुणे शहरात राहत असताना वापरलेली वाहने एनआयने जप्त केली आहे.
पुणे शहरात मागील वर्षी दोन दशतवाद्यांना पुणे पोलिसांनी अटक केली होती. पुणे पोलिसांनी एका मोटारसायकल चोरी प्रकरणाचा शोध घेत होते. त्यावेळी इम्रान खान आणि मोहम्मद युनूस साकी या दोघांची चौकशी केली असता ते घाबरले. यामुळे पोलिसांना संशय आला. त्याच्या घराची तपासणी केली असता आक्षेपार्ह साहित्य मिळाले. त्यावेळी त्यांचा तिसरा साथीदार फरार झाला. त्यानंतर पोलिसांच्या चौकशीत ते एनआयएच्या यादीत असणारे मोस्ट वॉटेंड दहशतवादी असल्याचे स्पष्ट झाले. सुरुवातीला हा तपास महाराष्ट्र एटीएसने केला. परंतु प्रकरणाची व्याप्ती पाहिल्यानंतर तो एनआयकडे देण्यात आला.
एनआयएच्या ताब्यात असलेल्या दहशतवाद्यांची कसून चौकशी करण्यात आली. त्यानंतर २० एप्रिल रोजी एनआयएचे पथक पुण्यात आले. पुण्यातील कोंढव्यात दहशतवादी रहात असताना त्यांनी वापरलेली वाहने शनिवारी पहाटे जप्त करण्यात आली आहेत. एनआयए आणि महाराष्ट्र एटीएसच्या पथकाने पहाटे कोढंव्यात ही कारवाई केली आहे.
काही दिवसांपूर्वी पुण्यातील कोंढवा भागातून इसीस या संघटनेशी संबंधित मोहम्मद युनुस साकी, इम्रान खान आणि मोहम्मद युसूफ खान या दहशतवाद्यांना अटक केली होती. या दहशतवादी संघटनेचे मोठे मॉड्युल एनआयएने उद्ध्वस्त करण्यात आले होते. त्यावेळी पळून जाण्यात यशस्वी ठरलेल्या मोहम्मद शाहनवाज यालाही पुढे अटक करण्यात आली. त्यांच्या चौकशीतून इसीस संघटनेशी संबंधित इतरही अनेक जणांना अटक करण्यात आली. त्याचबरोबर हे दहशतवादी कोढंव्यातील ज्या घरात भाड्यानं रहात होते, ती इमारतही जप्त करण्यात आली आहे.