पिंपरी चिंचवड : चिंचवड येथील एका स्नॅक्स सेंटरमध्ये (Pimpari Chinchwad News) सिलेंडरने पेट (Cylinder fire) घेतल्याने दुकान मालकासह दोघे भाजलेत. चिंचवडगावातील जैन शाळेजवळ हा प्रकार घडलाय. अग्निशमन दलाने सहा भरलेले सिलेंडर तत्काळ हलवल्याने पुढील अनर्थ टळलाय. या गंभीर घटनेत दोघे जण जखमी झालेत. त्यांना उपचारासाठी महापालिकेच्या वायसीएम रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे. सकाळी नऊ वाजण्याच्या सुमारात ही घटना घडली. अचानक सिलिंडरला आग (Pimpari Chinchwad fire) लागल्यानं गोंधळ उडाला होता. मनी तेवर आणि प्रदीप कुमार अशी जखमी झालेल्या दोघांची नावं असल्याची माहिती समोर आली आहे. मनी तेवर हा 32 वर्षांचा असून प्रदीप कुमार हा 20 वर्षाचा आहे. दोघेही जण या सिलिंडरच्या आगीमध्ये भाजले गेल्यानं गंभीर जखमी झालेत. मनी तेवर यांच्या मालकीचं हे स्नॅक्स सेंटर आहे. त्यांच्यावर सध्या एका खासगी रुग्णालयात उपचार सुरु आहेत. तर प्रदीपवर पालिकेच्या रुग्णालयामध्ये उपचार सुरु आहेत.
खरंतर यावेळी सकाळी नाश्ता करण्यासाठी काही ग्राहक दुकनावर आले होते. मात्र अचानक आग लागल्यानं मोठा गोंधळ उडाला. विशेष म्हणजे सिलिंडरला आग लागली तेव्हा त्या ठिकाणी सहा भरलेले सिलिंडरही होते. या सिलिंडरला तत्काळ बाजूला हटवणं गरजेचं होतं.
दरम्यान, अग्निशमन दलाच्या जवानांनी तत्काळ आग लागल्याचं कळताच घटनास्थळी धाव घेतली. सहा भरलेले सिलिंडर आग लागलेल्या ठिकाणी असल्याचं लक्षात येताच, हे सिलिंडर लगेचच तिथून बाजूला करण्यात आले. त्यामुळे मोठा अनर्थ टळलाय. अवघ्या दहा मिनिटांच्या आत अग्निशमन दलाच्या जवानांनी ही आग आटोक्यात आणली.
रस्त्यावर असलेल्या दुकानांमध्ये अनेकदा बेकायदेशीररीत्या सिलिंडरचा वापर केला जातो. हा वापर नियम धाब्यावर बसवून केला जातो. अशा परिस्थितीत केला जाणार सिलिंडरचा वापर हा आगी सारख्या घटनेत मोठा अनर्थ घडवू शकतो, अशी भीतीही व्यक्त केली जाते. त्यामुळेच काळजी घेण्याचं आवाहन करण्यात आलंय. तसंच सिलिंडरचा वापर करताना प्रत्येकानं खबरदारीही बाळगण्याची गरज आहे.