पिंपरी : पिंपरी-चिंचवड पोलिस आयुक्तलयातील पोलीस आयुक्त कृष्ण प्रकाश (Krishna Prakash) यांची बदली झाल्यानंतर अंकुश शिंदे यांची त्यांच्या जागी नियुक्ती करण्यात आली. त्यानुसार नवे पोलिस आयुक्त अंकुश शिंदे (Ankush Shinde) यांनी पिंपरी-चिंचवड पोलीस आयुक्तालयाचा आज पदभार स्वीकारला. अप्पर पोलीस आयुक्त संजय शिंदे यांनी पुष्पगुच्छ देऊन त्यांचं स्वागत केलं. पोलीस आयुक्त अंकुश शिंदे यांनी सध्या माध्यमांशी बोलण्यास नकार दिला. ते याअगोदर मुंबईमध्ये विशेष पोलीस महानिरीक्षक सुधार सेवा येथे कार्यरत होते. त्यांनी आज पोलीस आयुक्तालयाची सूत्रे हातात घेतली. कृष्ण प्रकाश हे नेहमी प्रकाशझोतात राहण्यासाठी प्रयत्न करत असतात. त्यामुळेच त्यांचं हे प्रकाश झोतात राहणं भोवल्याची चर्चा पोलीस आयुक्तालयात आहे. 2 सप्टेंबर 2020 रोजी कृष्ण प्रकाश यांनी पिंपरी पोलीस आयुक्तालयाचा पदभार स्वीकारला होता. त्यांचा कार्यकाळ पूर्ण होण्याअगोदरच त्यांची उचलबांगडी करण्यात आली आहे. मावळते पोलीस आयुक्त कृष्ण प्रकाश यांची पिंपरी-चिंचवडमधील कारकीर्द काहीशी वादात तर चर्चेची ठरली. (Pimpri-Chinchwad Police Commissioner Krishna Prakash transferred, Ankush Shinde appointed)
पोलीस आयुक्तांनी गुन्हेगारी मुक्त करणार असल्याचा विडाच उचलला होता. परंतु, गुन्हेगारी कमी करण्यात पोलीस आयुक्तांना यश आले नाही. पोलीस आयुक्तांनी वेशांतर करून पहिल्यांदाच पिंपरी-चिंचवड पोलीस आयुक्तालयात पोलीस कर्मचारी कशा प्रकारे नागरिकांना वागणूक देतात हे पाहण्यासाठी पोलीस ठाण्यांना भेट दिली होती. तेव्हा त्यांची महाराष्ट्रभर कौतुकास्पद चर्चा झाली. तर, चाकण येथे किरकोळ गुंडाना पकडण्यासाठी गेलेले पोलीस आयुक्त यांच्यावर गोळीबार झाला होता. तिथं डोंगराच्या विरुद्ध दिशेला झाड फेकून तीन जणांना आडव केलं होतं या कारवाईमुळे त्यांच्यावर टीका तर झालीच पण ते संशयाच्या भोवऱ्यात अडकले होते. शिवाय, खंडणी मागणाऱ्या आरोपीला हॉटेलमध्ये फिल्मीस्टाईल पकडून मिशिवर ताव मारणाऱ्या कृष्ण प्रकाश यांची तेव्हा देखील चर्चा रंगली होती. कृष्ण प्रकाश यांचा नेहमी प्रकाश झोतात राहण्यासाठी आटापिटा होता. तोच त्यांना भोवल्याची चर्चा सुरु आहे.
पिंपरी-चिंचवड आयुक्तालयात सिपींनी कधीच कार्यकाळ पूर्ण केला नाही. पिंपरी-चिंचवडचे पहिले पोलीस आयुक्त आर.के. पद्मनाभन, संदीप बिष्णोई आणि आता कृष्ण प्रकाश यांचा कार्यकाळ होण्याआधीच बदली करण्यात आली. एक प्रकारे ही उचलबांगडीच केल्याचं सांगण्यात येत आहे. कृष्ण प्रकाश यांची कारकीर्द वादाची तितकीच प्रसिद्धिमय होती असं म्हणायला हरकत नाही. (Pimpri-Chinchwad Police Commissioner Krishna Prakash transferred, Ankush Shinde appointed)
इतर बातम्या