पुणे शहरात खळबळजनक घटना घडली आहे. पोलीस चौकीतच एका पोलीस कर्मचाऱ्याने स्वतःवर एकापाठोपाठ चार गोळ्या झाडल्या. भारत दत्ता आस्मर असे त्या पोलीस कर्मचाऱ्याचे नाव आहे. पुण्यातील खडक पोलीस स्टेशन अंतर्गत असलेल्या लोहिया नगर पोलीस चौकीतील ही घटना घडली. शुक्रवारी पहाटे पोलीस कर्मचाऱ्याने गोळी झाडून आत्महत्या केल्याने पोलीस दलात खळबळ उडाली आहे. कौटुंबिक वाद किंवा अन्य कोणत्या कारणामुळे त्यांनी जीवन संपवले, हे चौकशीतून स्पष्ट होणार आहे.
पुणे येथील खडक पोलीस ठाण्यात भारत आस्मर हे पोलीस शिपाई म्हणून कार्यरत होते. गुरुवारी नेहमीप्रमाणे रात्रपाळीसाठी ते कामावर आले होते. त्यांची नेमणूक असलेल्या लोहिया नगर पोलीस चौकीत गेले. रात्री आपली बंदूक सोबत घेऊन वर असणाऱ्या खोलीत आरामासाठी गेले. परंतु अचानक काय झाले त्यांनी स्वत:वर एकापाठोपाठ चार गोळ्या झाडल्या. या घटनेत त्यांचा जागेवरच मृत्यू झाला.
भारत दत्ता आस्मर मागील काही दिवसांपासून तणावात होते. परंतु त्यासंदर्भात ते कोणाकडे काही बोलले नव्हते. त्यांच्या तणावाचे कारण समजले नव्हते. गेल्या आठ, दहा वर्षांपूर्वी ते पोलीस दलात दाखल झाले होते. या घटनेची आता चौकशी करण्यात येणार आहे.
नाशिकमध्ये फेब्रुवारी महिन्यात पोलीस कर्मचाऱ्याने आत्महत्या केली होती. त्यावेळी अंबड पोलीस ठाण्यात अशोक नजन नावाच्या पोलीस निरीक्षकाने आपल्या सर्व्हिस रिव्हॉल्व्हरने आपल्या केबिनमध्ये गोळी झाडून आत्महत्या केली. बंदुकीच्या गोळीचा आवाज आल्यावर सहकाऱ्यांनी केबिनकडे धाव घेतली असता नजन खुर्चीवर रक्ताच्या थारोळ्यात पडलेला दिसले होते.