रणजित जाधव, पुणे | 12 ऑक्टोंबर 2023 : सरकारी अधिकाऱ्यांच्या संपत्तीची चर्चा अधूनमधून होत असते. मग कधी उत्पन्नापेक्षा अधिक संपती मिळालेल्या सरकारी अधिकाऱ्यांवर छापे पडतात. त्यांच्या संपतीची माहिती त्यानंतर बाहेर येत असते. आता सरकारी अधिकारी असलेल्या व्यक्तीचे वेगळेच प्रकरण समोर आले आहे. पुणे पोलीस दलात कार्यरत असलेल्या पोलीस उपनिरीक्षक असलेले सोमनाथ झेंडे हे करोडपती झाले आहे. ते कोरडपती वेगळ्याच माध्यमातून झाले आहे. परंतु आता त्यांच्यासमोर अडचण वाढणार आहे. त्यांची चौकशी करण्याचा निर्णय झाला आहे.
पोलीस उपनिरीक्षक असलेले सोमनाथ झेंडे हे क्रिकेट चाहते आहेत. सध्या सर्वत्र विश्वचषकाचा फिवर असल्यामुळे त्यांना क्रिकेटचे फिवर आले आहे. स्पर्धा सुरु होण्यापूर्वीपासून झेंडे यांना ड्रीम इलेव्हन या ऑनलाइन गेमचे वेड लागले होते. झेंडे यांनी वर्ल्डकपमधील खेळाडूंचा अभ्यास केला. त्यानंतर त्यांनी ड्रीम इलेव्हनवर टीम तयार केली. नुकताच झालेल्या बांगलादेश विरुद्ध इंग्लंड त्यांच्या ड्रीम इलेव्हनची टीम अव्वल आली. त्यातून सोमनाथ झेंडे यांना दीड कोटी रुपये मिळाले.
ड्रीम 11 मधून करोडपती झालेल्या पोलीस उपनिरीक्षक सोमनाथ झेंडे यांची चौकशी होणार आहे. बक्षिसाच्या दीड कोटींमुळे आता झेंडे यांना खात्यातंर्गत चौकशीला सामोरे जावे लागणार आहे. कारण ऑनलाईन गेमिंगमध्ये तरुणाई भरकटत चालली आहे. या गेमिंगमधून अनेकांची फसवणूक होते. त्यावेळी पिंपरी चिंचवडमधील पोलीस उपनिरीक्षक सोमनाथ झेंडे यांना ड्रीम 11 खेळण्याचा मोह झाला.
पीएसआय सोमनाथ झेंडे यांची आता डिसीपीकडून चौकशी करण्यात येणार आहे. प्रशासकीय तसेच कायदेशीर बाबी यामध्ये तपासल्या जाणार आहेत. त्यानंतर त्यांच्यावर कारवाई करण्यात येईल, असे पिंपरी चिंचवड पोलिसांकडून स्पष्ट करण्यात आले आहे. आता या चौकशीत त्यांच्यावर काही कारवाई होते की हा केवळ कारवाईचा फार्स ठरतो, हे लवकरच स्पष्ट होणार आहे. परंतु आता सोमनाथ झेंडे यांच्या करोडपती होण्याची चर्चा सुरु आहे.