रणजित जाधव, पुणे | 2 ऑक्टोंबर 2023 : पुणे शहरातील पिंपरी चिंचवडमधील व्यावसायिकाच्या खंडणी प्रकरणाचा खुलासा पोलिसांनी केला आहे. व्यावसायिक संजय कुरुंदवाडे यांचे अपहरण करून त्यांच्याकडे एक कोटी रुपयांची खंडणी मागितली. सहा ते सात जणांनी त्यांचे अपहरण केले होते. त्यानंतर त्यांना धमकावत एक कोटी देण्याची मागणी केली. पैसे न दिल्यास कुटुंबातील व्यक्तींचा गेम करू, अशी धमकी दिली. पैसे एटीएममधील कचऱ्याच्या डब्यात टाकण्यास लावले.
संजय कुरुंदवाडे यांचे 21 सप्टेंबर रोजी आळंदी फाटा येथून चाकणकडे जात असताना रात्री नऊ वाजता अपहरण झाले होते. त्यांच्या गाडीला रिक्षा आडवी लावली. पाच ते सहा जणांनी संजय यांना अडवून त्यांच्या गाडीची चावी आणि मोबाईल फोन हिसकवून घेतले. त्यांना त्या रिक्षेत जबरदस्तीने बसवून शिरोली येथील शेतात नेले. त्यांना शेतात डांबून ठेवले होते.
अपहरण करणाऱ्यांनी त्यांच्याकडून एक कोटी रुपये देण्याची मागणी केली. पैसे दिले नाही तर तुझ्यासह तुझ्या घरच्यांनाही ठार करु, असे सांगत त्यांच्या बॅगमधील 20 हजार रुपये काढून घेतले. दोन दिवसांत 12 लाख रुपये दे असे सांगत संजय कुरुंदवाडे यांना सारा सिटी येथे दुचाकीवरून आणून सोडले. मग सतत फोन करून पैशांची मागणी कायम ठेवली.
संजय कुरुंदवाडे यांनी पैसे देण्यास होकार दिल्यावर त्यांनी हे पैसे घेण्याऐवजी नाणेकरवाडी येथील हिताची कंपनीच्या एटीएम सेंटरमध्ये ठेवण्यास सांगितले. एटीएममधील कचऱ्याच्या डब्यात पैसे टाकण्याचे आरोपींनी सांगितले. हा प्रकार संजय कुरुंदवाडे यांनी पोलिसांना सांगितला. त्यानंतर पोलिसांनी पाळत ठेवली. एटीएममध्ये पैसे घेण्यासाठी आरोपी येताच त्याला अटक केली. आकाश भुरे असे आरोपीचे नाव आहे. त्यानंतर त्याच्या चार साथीदार शुभम उर्फ सोन्या विनोद काकडे, शुभम युवराज सरवदे, अजय नंदू होले, नवनाथ शांताराम बच्छे यांनाही अटक केली. आरोपी सराईत गुन्हेगार आहे. इतर आरोपींचा शोध सुरु आहे.