पुणे | 30 सप्टेंबर 2023 : पुणे शहरात सर्वात उच्चभ्रू भाग असलेल्या प्रभात रोडवर धक्कादायक घटना घडली आहे. या ठिकाणी महावितरणाचे थकीत बिल वसुलीसाठी दोन महिला कर्मचारी गेले. त्यावेळी त्यांच्या अंगावर कुत्री सोडण्यात आली. लिफ्टचा दरवाजा बंद करुन त्यांना डांबून ठेवण्याचा प्रयत्न झाला. त्या महिला कर्मचाऱ्यांनी ऑफिसला फोन केल्यावर तातडीने डेक्कन पोलीस घटनास्थळी आले. त्यांनी त्या महिला कर्मचाऱ्यांची सुटका करत दोन आरोपींवर गुन्हा दाखल केला. या प्रकारामुळे महिला कर्मचारी चांगल्याच धास्तवल्या होत्या.
पुणे येथील प्रभात रोडवर सरस्वती अपार्टमेंट आहे. या ठिकाणी महावितरणचे कर्मचारी असलेल्या करुणा विजय आधारी आणि रुपाली कुटे या दोघी जण वीज बिल वसुलीसाठी गेल्या. त्यांनी सोसायटीतील वॉचमनला बोलवले. परंतु कोणीही आले नाही. मग आरती ललित बोडे यांचे पाच हजाराचे बिल थकलेले असल्यामुळे त्यांचा विद्युत पुरवठा खंडीत केला.
घरातील वीज कापली गेल्यानंतर बोडे कुटुंबीय आले. महावितरण कर्मचाऱ्यांनी तुम्ही वीज बिल भरल्यावर विद्युत पुरवठा सुरु करुन देऊ, असे स्पष्ट सांगितले. त्यावेळी त्यांनी चेक घ्या आणि वीज पुरवठा सुरु करा, असे सांगितले. परंतु चेक न देता तुम्ही ऑनलाईन बील भरा, तुमचा वीज पुरवठा सुरुळीत होईल, असे दोघांनी सांगितले. त्याचवेळी दोन महिला आणि एका व्यक्तीने त्यांच्याशी वाद घालण्यास सुरुवात केली. त्यांनी त्यांना शिवीगाळ करण्यास सुरुवात केली. तसेच लिफ्टचा दरवाजा बंद केला आणि आत कुत्री सोडली.
लिफ्टचा दरवाजा बंद झाला आणि कुत्रे सोडल्यामुळे दोन्ही कर्मचारी घाबरले. त्यांनी तातडीने महावितरणच्या ऑफिसमध्ये संपर्क साधला. महावितरणाच्या अधिकाऱ्यांनी पोलिसांना घटनेची माहिती दिली. डेक्कन पोलीस तातडीने घटनास्थळी दाखल झाले. त्यांनी आरोपी ललित बोडे आणि आरती बोडे यांच्यावर सरकारी कामात अडथळा आणल्याच्या आरोपाखाली गुन्हा दाखल केला आहे.