अभिजित पोते, पुणे | दि. 10 मार्च 2024 : पुणे शहरात शुक्रवारी मध्यरात्री तणाव निर्माण झाला होता. कसबा पेठेत दर्ग्याचे अतिक्रमण काढण्याची अफवा काही समाजकंटकांनी पसरवली होती. हे प्रकरण पुणे पोलिसांनी संयमाने हाताळत शहरात शांतता निर्माण केली. त्यानंतर पोलिसांनी शेख सल्लाउद्दीन दर्ग्याच्या ट्रस्टची बैठक घेतली. या बैठकीत दर्ग्याचे अनधिकृत बांधकाम काढण्याची तयारी ट्रस्टकडून देण्यात आली. अतिक्रमणाचा वाद मिटल्यानंतर त्यानंतर पुणे पोलिसांनी आपला मोर्चा अफवा पसरवणाऱ्यांकडे वळवला. या प्रकरणात पोलिसांनी कठोर कारवाई करत ३० ते ३५ जणांवर गुन्हा दाखल केला.
दोन दिवसांपूर्वी पुण्यातील कसबा परिसरात असणाऱ्या दर्ग्या संदर्भात अफवा पसरवत अनेक मुस्लिम बांधवांची दिशाभूल करण्यात आली होती. यामुळे पुणे पोलिसांनी दोन समाजात तेढ निर्माण केल्याप्रमाणे 30 ते 35 जणांवर पुण्यातील फरासखाना पोलीस स्टेशनमध्ये गुन्हा दाखल केला. चुकीची माहिती पसरवणाऱ्यांवर हा गुन्हा दाखल करण्यात आला आहे. त्यामुळे सोशल मीडियातून अफवा पसरवणाऱ्यांना चांगली अद्दल घडणार आहे.
पुण्यातील शेख सल्लाउद्दीन दर्ग्याच्या अनधिकृत बांधकाम रात्री पाडण्यात येणार असल्याची अफवा पसरली होती. त्यानंतर शुक्रवारी रात्री कसबा पेठेतील दर्ग्यासमोर गर्दी जमा होऊ लागली. त्यामुळे या परिसरात तणाव निर्माण झाला. पोलिसांनी संयमाने परिस्थिती हाताळत बंदोबस्त वाढवला. तसेच दुसरीकडे ट्रस्टींची बैठक घेतली. सर्व पोलीस कर्मचारी आणि अधिकाऱ्यांच्या सुट्या आयुक्त अमितेश कुमार यांनी रद्द केल्या. एकाच वेळी अनेक पातळ्यांवर सुरु केलेल्या या उपायांमुळे पुणे शहरात कोणताची अनुचित प्रकार घडला नाही. शहरात शांतता निर्माण झाली.
दर्ग्यातील अतिक्रमण काढण्याचा निर्णय ट्रस्टींकडून घेण्यात आला. त्यानंतर पुणे मनपाने आणखी एक पाऊल पुढे केले. ट्रस्टीने विनंती केल्यास कायदेशीर असलेल्या कामांच्या नूतनीकरणासाठी पुणे मनपाने मदत करण्याचा निर्णय घेतला आहे.