पुणे | 18 सप्टेंबर 2023 : पुणे शहरातील सहा महिन्यांपूर्वी घडलेल्या प्रकरणाचा खुलासा पोलिसांकडून झाला आहे. सहा महिन्यांपासून बेपत्ता असलेल्या त्या व्यक्तीचे काय झाले, हे आता समजले आहे. या प्रकरणात मित्रानेच मित्राचा घात केल्याचा प्रकार समोर आला आहे. अखेर आरोपीने कितीही हुशारी दाखवली तरी पोलीस त्याचा पुढेच असतात, हे पुन्हा एकदा सिद्ध झाले. या प्रकरणी आरोपीला अटक करण्यात आले आहे. आरोपीने घडलेला प्रकार पोलिसांना सांगितला आहे.
पुणे येथील दिनेश दशरथ कांबळे हा सहा महिन्यांपासून बेपत्ता होता. त्याच्या आईने वाकड पोलीस ठाण्यात यासंदर्भात तक्रार दिली होती. त्यानंतर पोलिसांनी तो हरवला असल्याची नोंद केली. पोलिसांनी त्याची माहिती काढण्यास सुरुवात केली. त्यावेळी दिनेश हा अनेक दिवस घरी येत नसल्याचे समजले. एकदा तो वडिलांची सोन्याची चैन चोरून गेला होता. त्यामुळे त्याला घरच्या मंडळींना चांगलेच झापून काढले. तेव्हा सोन्याची चैन परत घेऊन येतो म्हणून घरा बाहेर पडला परंतु आलाच नाही.
पोलिसांकडे तक्रार आल्यावर तपास सुरू झाला. दिनेशच्या मित्राकडे चौकशी केली. त्यावेळी १५ मार्च २०२३ रोजी तो मित्र सिद्धांत आणि प्रतीक सरवदे यांच्यासोबत दारू पीत बसल्याची माहिती पोलिसांना मिळाली. पोलिसांनी त्या दोघांची चौकशी सुरु केली. तेव्हा झालेला प्रकार समजला. दिनेशने दारूच्या नशेत प्रतीक सरवदे याच्या पत्नीबद्दल अश्लील शब्द वापरला. त्यामुळे प्रतीकने दिनेशच्या डोक्यात दगडाने वार केला. त्यात तो जखमी झाला. यानंतर प्रतीक आणि सिद्धांत यांनी दिनेशला दुचाकीवरून नाशिक फाटा येथील पुलावर नेले आणि खाली फेकून दिले. यामुळे दिनेशचा मृत्यू झाला.
वरिष्ठ पोलिस निरीक्षक गणेश जवादवाड यांच्या नेतृत्वाखील पोलिसांनी या घटनेचा तपास केला. प्रतीक आणि सिद्धांत यांना पोलिसी खाक्या दाखवल्या. त्यानंतर दोघांनीही त्या खुनाची कबूल दिली. यामुळे तब्बल सहा महिन्यानंतर खुनाचा हा उघडक झाला. वाकड पोलिसांनी दोन आरोपींना अटक केली आहे.