पुणे | 25 जुलै 2023 : पुणे शहरात सोमवारी पहाटे सर्वांना हादरवणारी दुर्देवी घटना घडली. सहायक पोलीस आयुक्त असलेले भारत गायकवाड यांनी आपल्या कुटुंबातील दोघांना संपवले. त्यानंतर स्वत: आत्महत्या केली. अमरावती पोलीस दलातील भारत गायकवाड कार्यरत होते. त्यांना निवृत्त होण्यास खूपच कमी कालावधी राहिला होता. त्यांनी सोमवारी पत्नीला गोळी मारली त्यानंतर पुतण्या धावत आला तर त्यालाही संपवले. मग स्वतः आत्महत्या केली.
भारत गायकवाड (वय ५७) ४ जून २०२१ रोजी अमरावती पोलीस दलात पदोन्नतीवर रुजू झाले. ३१ मे २०२४ रोजी ते निवृत्त होणार होते. १५ जुलै रोजी ते सुटी घेऊन ते पुण्याला आले. सोमवारी पहाटे ३ वाजून २० मिनिटांनी त्यांनी पत्नी मोनी हिला गोळी मारली. गोळीबाराचा आवाज ऐकून पुतण्या दीपक धावत त्यांचा खोलीकडे धावत आला. त्याने दरवाजा उघडला तर त्याला गोळी मारली. त्यानंतर स्वत:वर गोळी झाडत आत्महत्या केली.
दीपक गायकवाड पुण्यातच धायरीत राहतो. तर भारत गायकवाड यांचे कुटुंब बाणेरमध्ये राहतात. दीपक जेव्हाही काका येत होते, तेव्हा त्यांच्यासाठी मटण घेऊन येत होता. राविवारी रात्री २३ जुलै रोजी तो काकांसाठी मटण घेऊन आला होता. परंतु पाऊस सुरु असल्यामुळे तो धायरीला परत न जाता थांबला. मग रात्री त्याठिकाणी झोपला अन् ३ वाजेच्या सुमारास गोळीबाराचा आवाज ऐकून धावून आला. परंतु त्याच्यावर काकांनी गोळी चालवली.
भारत गायकवाड यांचा मोठा मुलगा हर्षवर्धन हा जुन्या गाड्या खरेदी विक्रीचा व्यवसाय करतो. लहान मुलगा सुहास हा हॉटेल मॅनेजमेंट करत आहे. रविवारी रात्री १० वाजता जेवण केल्यावर सर्व जण झोपले. त्यानंतर पहाटे भारत यांच्या खोलीतून गोळीचा आवाज ऐकल्यानंतर सर्वांनी धाव घेतली. सुहासने दुसरी चाबी आणत दीपकला दिली. दीपकने खोलीचे दार उघडताच त्यालाही गोळी मारली. सुहास आत आल्यावर तु बाहेर जा, नाहीतर तुलाही गोळी मारेल, असे सांगितले. त्यानंतर भारत यांनी स्वत:वर गोळी झाडत आत्महत्या केली.