पुणे | 25 जुलै 2023 : पुणे शहर आणि परिसरात गुन्हेगारी मोडण्यासाठी पोलिसांकडून सुरु असलेले प्रयत्न अपुरे पडत आहेत. पोलिसांनी कोयता गँगच्या मुसक्या आवळण्यासाठी विविध उपाययोजना केल्या आहेत. शहरातील पोलीस चौक्या आता २४ तास सुरु केल्या आहेत. कोंबिंग ऑपेरशन राबवून गुन्हेगारांवर धडक कारवाई केली जात आहे. अनेक जणांना अटक केली गेली आहे. काही जणांवर मोकोकासारखी कठोर कारवाई केली. यानंतर गुन्हेगारी फोफावली आहे. आता बंद असलेल्या फ्लॅटमधून लाखोंचा ऐवज चोरीला गेला आहे.
पुण्यातील कात्रज भागातून लाखोंचा ऐवज चोरीला गेल्याची घटना घडली आहे. रविवारी पहाटे 3 वाजता आयकर सल्लागाराच्या घरात ही चोरी झाली आहे. कात्रज येथील गुजर-निंबाळकरवाडी भागात आयकर सल्लागार राहतात. ते कुटुंबियांसह बालाजीनगर येथील दुसऱ्या घरात गेले होते. त्यामुळे त्यांचा कात्रजमधील फ्लॅट बंद होता. त्या बंद फ्लॅटमधून 11.28 लाख रुपयांचे सोन्या-चांदीचे दागिने चोरीला गेले.
आयकर सल्लागार सोमवारी आल्यावर त्यांना घरात चोरी झाल्याचे लक्षात आले. त्यांनी भारती विद्यापीठ पोलीस ठाण्यात तक्रार दाखल केली. यासंदर्भात बोलताना सहाय्यक पोलीस निरीक्षक अमोल रसाळ यांनी सांगितले की, “आयकर सल्लागाराच्या कात्रज फ्लॅटमध्ये चोरट्यांनी प्रवेश केला. त्यानंतर त्यांनी कपाटाचे कुलूप तोडून दागिने चोरून पळ काढला. आता या प्रकरणाचा तपास सुरु केला आहे. पोलिस रेकॉर्डवरील गुन्हेगारांची तपासणी केली जात आहेत”.
दरम्यान ज्या ठिकाणी चोरी झाली त्या ठिकाणी असलेल्या सोसायटीत सीसीटीव्ही कॅमेरे नव्हते. तसेच सुरक्षा रक्षकही तैनात नव्हते. यामुळे चोरट्यांना शोधणे पोलिसांसाठी आव्हान ठरणार आहे.