पुणे : लोणवळ्यात वरिष्ठ डॉक्टरांच्या घरात सशस्त्र दरोडा पडल्याचा धक्कादायक प्रकार समोर आला आहे. डॉ हिरालाल खंडेलवाल आणि त्यांच्या पत्नीचे हात-पाय बांधून सहा दरोडेखोरांनी चोरी केली. 66 लाखांचा मुद्देमाल घेऊन दरोडेखोर पसार झाल्याचा दावा खंडेलवाल दाम्पत्याने केला आहे. दरोडेखोर दोरखंडाने खाली येताना सीसीटीव्हीमध्ये कैद झाले आहेत. (Pune Crime News Lonavla Doctor Couple Robbery)
पुणे जिल्ह्यात लोणावळा परिसरातील प्रधान पार्क भागात डॉ हिरालाल खंडेलवाल आणि त्यांची पत्नी विजया खंडेलवाल राहतात. दरोडेखोरांनी खंडेलवाल दाम्पत्याच्या घरात प्रवेश करुन त्यांचे हात-पाय बांधले आणि सशस्त्र दरोडा टाकला.
सहा दरोडेखोरांचा धारदार शस्त्रासह शिरकाव
पहाटेच्या सुमारास डॉ खंडेलवाल यांच्या पहिल्या मजल्यावरील घराची खिडकी उघडून सहा दरोडेखोरांनी धारदार शस्त्रासह आतमध्ये प्रवेश केला. त्यानंतर डॉ खंडेलवाल आणि त्यांची पत्नी विजया खंडेलवाल यांना शस्त्रांचा धाक दाखवत त्यांचे हात-पाय रश्शीने बांधले. घरातील सर्व रोख रक्कम आणि सोने असा ऐवज त्यांनी लुटून नेला.
66 लाखांचा ऐवज चोरल्याचा दावा
50 लाख रुपये रोख आणि 16 लाख 77 हजार 500 रुपये किंमतीचे दागिने असा एकूण 66 लाख 77 हजाराचा मुद्देमाल दरोडेखोरांनी लुटल्याचा आरोप आहे. या प्रकारानंतर हे सहा दरोडेखोर गच्चीवरुन चादर बांधत उतरुन पसार झाले. दरोडेखोर हे रस्सीने खाली येताना सीसीटीव्हीमध्ये कैद झाले आहेत.
पाहा व्हिडीओ :
कुख्यात दरोडेखोरांची टोळी गजाआड
दुसरीकडे, मीरा भाईंदर, वसई विरार पोलीस आयुक्तालयाच्या गुन्हे अन्वेषण शाखा तीनने सोमवारी रात्री सापळा रचून देशभर धुमाकूळ घातलेल्या आणि गोडासन या आंतरराष्ट्रीय चोरी आणि दरोड्यासाठी कुख्यात असलेल्या टोळीच्या मुसक्या आवळल्या आहेत. यात पोलिसांनी 10 आरोपींना अटक केली आहे. तर एक जण फरार आहे. ही टोळी भिकाऱ्याचा वेशात दुकानाबाहेर रेकी करायची. नंतर मध्यरात्री दरोडा टाकायची.
टोळी नालासोपाऱ्यातील संतोष भुवन या परिसरातील एका पेट्रोल पंपावर दरोडा टाकणासाठी येणार आहे, अशी माहिती पोलिसांना मिळाली. या माहितीच्या आधारे पोलिसांनी सोमवारी (14 जून) रात्री 12 च्या सुमारास सापळा रचत या टोळीला अटक केली. पोलिसांनी त्यांच्याकडून मिरची पावडर, कटावन्या, कोयते जप्त केले आहेत. पण या टोळीतील एक जण पळून जाण्यात यशस्वी ठरला
संबंधित बातम्या :
दुकानासमोर भिकारी बनून रेकी, नंतर दरोडा, देशभरात धुमाकूळ माजवणारी टोळी नालासोपाऱ्यात जेरबंद
(Pune Crime News Lonavla Doctor Couple Robbery)