पुणे | 16 सप्टेंबर 2023 : सध्या सर्व काही ऑनलाईन झाले आहे. यामुळे एका मोबाईल ॲपमधून अनेक गोष्टी साध्य होतात. त्यातच आता अनेक जण ऑनलाईन पार्टटाईम जॉब शोधत असतात. या प्रकारच्या जॉबमधून आधी थोडे पैसे दिले जातात. त्यानंतर जास्त पैशांचे आमिष दाखवून गुंतवणूक करण्यास भाग पाडले जाते. मग लाखो रुपयांमध्ये फसवणूक केल्याचे अनेक प्रकार पुणे शहरात घडले आहे. पुणे शहरात दोन दिवसांपूर्वी 34 लाखांत फसवणुकीचा प्रकार घडला. परंतु सायबर पोलिसांनी प्रथमच 24 तासांत आरोपी शोधला.
सध्या व्हॉट्सॲपवर ऑनलाईन जॉबचे अनेक मेसेज येतात. गुगल सर्च टास्कचे काम देऊन पैसे दिले जातात. सुरुवातीला त्यासाठी काही रक्कम दिली जाते. त्यानंतर अधिक पैसे मिळण्यासाठी गुंतवणूक करण्यास सांगितले जाते. पुणे शहरातील एका व्यक्तीकडून असेच 34 लाख 97 हजार रुपये घेतले गेले. त्यानंतर त्याला आपली फसवणूक झाल्याचे समजले. मग 12 सप्टेंबर रोजी गुन्हा दाखल झाला.
सायबर पोलिसांकडे तक्रार येताच तपास सुरु करण्यात आला. ज्या खात्यात पैसे गेले, त्याचा शोध सुरु केला. मग तुषार अजवानी याच्या व्हॉलेटवर पैसे गेल्याचे दिसले. त्याचा शोध घेतला असता तो जुहू मुंबई येथील असल्याची माहिती मिळाली. त्यानुसार पोउनि सचिन जाधव यांच्या नेतृत्वाखाली पथकाने मुंबईत जाऊन छापा टाकला. तुषार अजवानी याला अटक केली. आरोपीला न्यायालयात हजर केले असता 18 सप्टेंबरपर्यंत न्यायालयीन कोठडीत ठेवण्याचे आदेश दिले. प्रथमच २४ तासांत आरोपी पकडला गेला आहे.
टॉस्क फ्रॉड, पार्ट टाईम जॉब, जादा परतावा, कमिशन मिळेल या पद्धतीने आमिष दाखवून फसवणूक करण्याचे प्रकार वाढत आहे. यामुळे कोणीही या प्रकारच्या फसवणुकीला बळी पडू नये. असे प्रकार दिसल्यास त्वरित सायबर पोलिसांना संपर्क करावा.