Pune Crime News: शिक्षणाचे माहेरघर असलेल्या पुण्यात धक्कादायक प्रकार समोर आला आहे. पुण्यातील वारजे माळवाडी एका खासगी शाळेत नृत्य शिक्षकाने ११ वर्षांच्या विद्यार्थ्यासह इतर काही विद्यार्थ्यांवर अत्याचार केल्याचा प्रकार समोर आला आहे. हा प्रकार समोर आल्यानंतर शिक्षकाविरुद्ध दोन गुन्हे दाखल करण्यात आले. त्याला अटकही करण्यात आली आहे. तसेच या प्रकरणात संस्थाचालकासही अटक करण्यात आली आहे.
वारजे माळवाडी भागातील एका नामवंत शाळेतील नृत्य शिक्षकाने ११ वर्षांच्या विद्यार्थ्यासह अन्य विद्यार्थ्यांवर अत्याचार केल्याची धक्कादायक घटना मंगळवारी उघड झाली होती. त्यानंतर त्या शिक्षकावर गुन्हा दाखल करण्यात आला. ३९ वर्षीय हा शिक्षक पहिली ते पाचवीतील विद्यार्थ्यांना प्रशिक्षण देत होता. त्याने मागील दोन वर्षांपासून विद्यार्थ्यांवर अत्याचार केल्याचा प्रकार उघड झाला.
नृत्य शिक्षक विद्यार्थ्याशी अनैतिक कृत्य करत होता. त्याचे चित्रण मोबाईलमध्ये करत होता. शाळेत विद्यार्थ्याचे समुपदेशन करण्यात येत होते. त्यावेळी विद्यार्थ्यांना ‘गुड टच, बॅड टच’ची माहिती देण्यात आली. त्यावेळी विद्यार्थ्यांनी शिक्षकाच्या कृत्याचा भांडाफोड केला. त्यामुळे त्याच्यावर गुन्हा दाखल करण्यात आला. त्या शिक्षकाला न्यालायात उभे केले असता २२ डिसेंबरपर्यंत पोलीस कोठडीत ठेवण्याचे आदेश दिले.
नृत्य शिक्षकाविरुद्ध दोन गुन्हे दाखल करण्यात आले आहे. तसेच शाळेत अल्पवयीन मुलांवरील लैंगिक छळवणूक प्रकरणी संस्थाचालक अन्वित पाठक यांना देखील अटक कारण्यात आली आहे. संस्था चालकाला आज अटक केली आहे. उद्या त्याला न्यायालयात हजर केले जाणार आहे. वारजे पोलीस स्थानकाच्या हद्दीत कर्वेनगरमधील शाळेत ही घटना घडली होती. एकूण 2 मुलांवर आत्याचार झाल्याची पालकांनी तक्रार केली होती. त्यानंतर शिक्षकावर दोन गुन्हे दाखल केले आहे. दरम्यान या घटनेनंतर पालक चांगलेच संतप्त झाले. त्यांनी शालेय प्रशासनाला जाब विचारला. या घटनेची गंभीर दखल घेऊन शिक्षकाला काढून टाकण्यात आले.