अभिजित पोते, पुणे | 18 ऑगस्ट 2023 : पुणे येथील संरक्षण संशोधन आणि विकास संस्थेचे (डीआरडीओ) माजी संचालक प्रदीप कुरुलकर हेरगिरी प्रकरणात कारागृहात आहेत. पाकिस्तानी लैलाच्या हनी ट्रॅपमध्ये प्रदीप कुरुलकर अडकले होते. त्यानंतर त्यांनी देशातील संरक्षणासंदर्भातील महत्वाची माहिती त्या महिलेस शेअर केली. हे प्रकरण उघड झाल्यानंतर त्यांनी त्यांच्या मोबाईलमधील फाईल डिलीट केल्या. या डिलिट केलेल्या फाईली रिकव्हर करण्यात पुणे शहरातील फॉरेन्सिक लॅबला अपयश आले आहे.
प्रदीप कुरुलकर तसास संस्थांना चौकशीला सहकार्य करत नाही. यामुळे त्याच्याकडून जप्त केलेला मोबाईल महत्वाचा पुरावा आहे. परंतु या मोबाईलमधील डेटा त्यांनी डिलिट केला आहे. या मोबाईलमधील डेटा रिकव्हर करण्याचा प्रयत्न पुणे फॉरेन्सिक लॅबमध्ये करण्यात आला. परंतु एकही फाइल्स ओपन नसल्याची माहिती एटीएसने शुक्रवारी कोर्टात दिली. यामुळे कुरुलकर यांचा वन प्लस फोन गुजरातच्या फॉरेन्सिक लॅबमध्ये तपासासाठी पाठवण्याची परवानगी एटीएसने कोर्टाकडे मागितली.
प्रदीप कुरुलकर यांनी जमीनसाठी अर्ज केला आहे. त्यांच्या जामीन अर्जावर 25 ऑगस्टला सुनावणी होणार आहे. त्याचवेळी कुरुलकर यांचा वन प्लस मोबाईल गुजरातच्या फॉरेन्सिक लॅबमध्ये पाठवण्याबाबत कोर्ट निर्णय देणार आहे. यामुळे जमिनासह कुरुलकर प्रकरणातील अनेक मुद्द्यांवर 25 तारखेला सुनावणी होणार आहे.
प्रदीप कुरुलकर हे ‘डीआरडीओ’चे माजी संचालक होते. त्यांच्याशी पाकिस्तानी गुप्तहेर महिला झारा दासगुप्ताने संपर्क केला होता. त्यानंतर त्यांनी स्वत:ची ओळख करुन दिली. मग दोघांचे चॅटींग वाढत गेले. त्यानंतर फोनवर बोलणे सुरु झाले. या दरम्यान कुरुलकर तिच्या जाळ्यात पूर्णपणे अडकले. तिला देशाच्या संरक्षणासंदर्भातील गोपनीय माहिती त्यांनी दिली. व्हॉटसॲप मेसेज, व्हिडिओ आणि व्हाइस कॉलद्वारे ही माहिती दिली.
हा प्रकरण उघड झाल्यानंतर एटीएसने प्रदीप कुरुलकर यांना मे महिन्यात अटक केली. तेव्हापासून ते पुणे शहरातील येरवडा कारागृहात आहे. डीओडीओकडूनही त्यांचे निलंबन करण्यात आले आहे.