मित्रांवर ठेवलेला विश्वास एका अभियांत्रिकी विद्यार्थिनीचा जीवावर बेतला. मित्रांनीच त्या विद्यार्थीनीचे अपहरण केले. तिच्या घरी नऊ लाखांची खंडणी देण्याचा मेसेज केले. त्यानंतर चिंतातूर झालेल्या तिच्या पालकांनी पोलीस ठाण्यात तक्रार दिली. पोलिसांनी खंडणीचा गुन्हा दाखल करुन तपास सुरु केला. त्यानंतर धक्कादायक प्रकरण समोर आले. त्या विद्यार्थिनीच्या मित्रांनीच तिचे अपहरण करुन खून केला होता. भाग्यश्री सूर्यकांत सुडे (वय २२) असे त्या विद्यार्थिनीचे नाव आहे. पुणे शहरात हा प्रकार घडला आहे. या प्रकरणी तिच्या तीन मित्रांना अटक करण्यात आली आहे.
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, लातूर जिल्ह्यातील हरंगूळ गावची रहिवाशी असलेली भाग्यश्री सुडे पुणे येथील वाघोलीत असणाऱ्या एका नामांकित महाविद्यालयात शिक्षण घेत होती. ‘बीई कॉम्प्युटर्स’ ला असणारी भाग्यश्री ३० मार्च रोजी बेपत्ता झाली. पुण्यातील फिनिक्स मॉल परिसरातून ती बेपत्ता झाली. तिच्याशी संपर्क होत नसल्यामुळे तिच्या पालकांनी पुणे गाठले. त्यानंतर पोलिसात तक्रार दिली होती. त्याचवेळी भाग्यश्रीच्या आई-वडिलांच्या मोबाईलवर नऊ लाखांची खंडणीचा मेसेज आला. तुम्ही नऊ लाख रुपये द्या, अन्यथा मुलीला मारून टाकू, अशी धमकी त्या मेसेजमध्ये होती.
घटनेचे गांभीर्य ओळखून पोलिसांनी तपास सुरु केला. तांत्रिक तपास करत एकाला ताब्यात घेतले. त्याला पोलीस खाक्या दाखवताच संपूर्ण प्रकरण उघड झाले. पुण्यातील मॉलमधून बाहेर आल्यानंतर ती शिवम फुलवाळे, सागर जाधव आणि सुरेश इंदूरे या मित्रांसोबत गेली होती. शिवम हा अभियांत्रिकीचे शिक्षण घेत आहे. हे तिघे मराठवड्यातील आहेत. जाधव आणि इंदूरे हे शिवमचे मित्र आहेत. त्यांनी भाग्यश्रीचा खून केल्याची कबुली दिली. ज्या दिवशी भाग्यश्रीचे अपहरण केले त्याच दिवशी तिचा खून केल्याचे त्यांनी सांगितले. सुपा गावाच्या हद्दीत तिचा मृतदेह पुरल्याचे आरोपींनी सांगितले.
आरोपी कर्जबाजारी झाले होते. त्यामुळे भाग्यश्रीचे अपहरण करुन पैसे मिळू शकतात, असा त्यांचा समज झाला होता. त्यातूनच त्यांनी खून केला. या प्रकरणात पुणे पोलिसांनी तिघांना अटक केली आहे.