पुणे | 5 सप्टेंबर 2023 : पुणे येथील डीआरडीओचे माजी संचालक प्रदीप कुरुलकर पाकिस्तानी गुप्तहेराच्या हनी ट्रॅपमध्ये अडकला आहे. पुणे एटीएसकडून त्याची कसून चौकशी केली गेली. परंतु या चौकशीत अजूनही काही माहिती उघड झालेली नाही. या प्रकरणात अनेक धक्कादायक माहिती मिळाली असली तरी प्रदीप कुरुलकर याला मिळालेले २४ तास महत्वाचे ठरले. त्या २४ तासांमुळे प्रदीप कुरुलकर तपास संस्थांना अजूनही संभ्रात ठेवत आहे. तपास संस्था अजूनही प्रतिक्षा करत आहे.
प्रदीप कुरुलकर डीआरडीओच्या अंतर्गत चौकशीत दोषी आढळला होता. त्यानंतर डीआरडीओने दहशतवादी पथकाकडे तक्रार केली. ही तक्रार झाल्यावर प्रदीप कुरुलकर याला चौकशीसाठी बोलवण्यात आले. मात्र एटीएसची तक्रार आणि प्रदीप कुरुलकर याची चौकशी या दरम्यान २४ तास मिळाले. या २४ तासात प्रदीप कुरुलकर याने मोबाईलमधील सर्व डेटा डिलीट केला. त्या डेटाची प्रतिक्षा तपास संस्थांना अजूनही आहे.
प्रदीप कुरुलकर याने डिलिट केलेला डाटा रिकव्हर करण्यासाठी पुणे येथील न्यायवैद्यक प्रयोगशाळेत दिला होता. परंतु पुणे येथील प्रयोगशाळेला तो रिकव्हर करता आला नाही. त्यानंतर सुरत येथील न्यायवैद्यक प्रयोगशाळेत हा डेटा पाठवला आहे. त्याचा अहवाल अजून महिन्याभरात मिळणार आहे. त्यामुळे ही प्रतिक्षा करावी लागणार आहे.
डीआरडीओ वरिष्ठ शास्त्रज्ञ डॉ. प्रदीप कुरुलकरने याने पाकिस्तानी हेराला पाठविलेली माहिती गोपनीय नाही, असा दावा प्रदीप कुरुलकर याच्या वकिलांनी केला आहे. त्याने त्या हेराला दिलेली सर्व माहिती सार्वजनिक संकेतस्थळांवर उपलब्ध आहे, असा दावा डॉ. कुरुलकर याचे वकील ॲड. ॠषीकेश गानू यांनी केला आहे.
प्रदीप कुरुलकर याची केस इन कॅमेरा चालवावी, अशी मागणी सरकारी वकिलांनी केली. सुनावणी दरम्यान उपलब्ध असलेली माहिती खुली झाल्यास देशाच्या सार्वभौमत्वाला आणि हिताला बाधा पोचेल, त्यामुळे या प्रकरणाची सुनावणी इन कॅमेरा करावी, अशी मागणी केली. त्याला आरोपीच्या वकिलांनी हरकत घेतली.