अभिजित पोते, पुणे | 5 ऑक्टोंबर 2023 : पुणे शहरात प्रसिद्ध असलेले हॉटेल वैशाली हिला तब्बल 72 वर्षांचा इतिहास आहे. खव्वयांमध्ये नेहमी या हॉटेलची चर्चा असते. या हॉटेलमधील पदार्थांचा स्वाद घेण्यासाठी पुण्यातूनच नाही तर जवळपासच्या भागातूनही लोक येतात. सध्या हे हॉटेल चर्चेत आले आहे. परंतु खाण्यासाठी नाही तर वेगळ्याच कारणामुळे त्याची चर्चा होत आहे. या हॉटेलमधील मालकीवरुन वाद रंगला आहे. हा वाद दोन पार्टनरमध्ये नाही तर पती आणि पत्नीमध्ये आहे. आता हे प्रकरण पोलीस ठाण्यापर्यंत गेला आहे.
पुणे येथील वैशाली हॉटेलच्या मालक निकिता शेट्टी आहेत. त्यांनी पती विश्वजीत विनायक जाधव यांच्यावर आरोप केला आहे. पती आणि इतरांकडून हे हॉटेल बळकवण्याचा प्रयत्न होत असल्याचे त्यांनी म्हटले आहे. विश्वजीत जाधव यांनी आपली खोटी सही करुन फ्लॅट तारण ठेवला. त्यानुसार पाच कोटी रुपयांचे कर्ज घेतल्याचा आरोप निकिता शेट्टी यांनी दिलेल्या तक्रारात केला आहे. त्यानंतर जाधव यांच्यावर गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
वैशाली हॉटेलच्या मालक असलेल्या निकिता शेट्टी यांनी दिलेल्या तक्रारीत पती विश्वजीत विनायक जाधव यांच्यासह इतर काही जणांची नावे आहेत. त्यात कोटक महिंद्रा बँकेच्या येरवडा शाखेचे व्यवस्थापक राजेश देवचंद्र चौधरी, डीएसए आर. आर. फायनान्सचे रवी परदेशी यांचा समावेश आहे. यामुळे पोलिसांनी या सर्वांविरोधात गुन्हा दाखल केला आहे. तसेच हॉटेल वैशालीची मालकीही विश्वजीत जाधव यांनी आपल्याला नशा देऊन काढल्याचा आरोप निकीता शेट्टी यांनी केला आहे.
जगन्नाथ शेट्टी यांनी पुणे शहरात हे हॉटेल बांधले. ते 1949 मध्ये पुणे येथे राहण्यासाठी आले. त्यानंतर त्यांनी व्यवसायात झेप घेतली. 1951 मध्ये पुणे शहरात एकाच वेळी तीन हॉटेल सुरु केल्यात. त्यात हॉटेल रुपाली, वैशाली आणि आम्रपाली यांचा समावेश आहे. पुणेकरांमध्ये दक्षिण भारतीय पदार्थ लोकप्रिय करण्याचे काम जगन्नाथ शेट्टी यांनी केले. त्यांच्या या कार्याची दाखल घेऊन अनेक सामाजिक संस्थांनी पुरस्कार देऊन त्यांचा गौरव केला. त्यात त्रिदल संस्थेने त्यांना “पुण्यभूषण पुरस्कार” दिला. या हॉटेलमधील पदार्थांचा स्वाद शरद पवार, राज ठाकरे यांच्यासह चित्रपटसृष्टीतील अनेक मान्यवरांनी घेतला आहे.