मंचर, पुणे, दि. 17 फेब्रुवारी 2024 | पुणे जिल्ह्यात पुन्हा भीषण अपघात झाला आहे. पुणे नाशिक राष्ट्रीय महामार्गावर शनिवारी पहाटे विचित्र अपघात झाला आहे. मंचरजवळ असलेल्या भोरवाडी येथे स्विफ्ट कार, टेम्पो आणि कंटेनरचा विचित्र अपघात झाला. या अपघातात स्विफ्ट कार जागीच जळून खाक झाली. यामुळे या गाडीतील तीन जणांचा होरपळून मृत्यू झाला. सुदैवाने कारचा चालक आणि टेम्पोचा चालक अपघातातून बचावले. मृत्यू झालेले तिघे जण खेड तालुक्यातील राक्षेवाडी येथील आहेत. या अपघातात एक जण गंभीर जखमी झाला आहे. त्याला रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे.
पुणे – नाशिक महामार्गावर पुण्याकडे जाणाऱ्या मार्गावर एक कंटेनर बंद पडला होता. या मार्गावर सकाळी टेम्पो आणि स्विफ्ट कारमध्ये जोरदार धडक झाली. त्यानंतर टेम्पो पुढे उभ्या असलेल्या कंटेनरवर धडकला. तर स्विफ्ट कारने पेट घेतली. त्यात स्विफ्ट गाडी पूर्णतः जळून खाक झाली आणि गाडीतील तिघांचा मृत्यू झाला.
अपघातात एक जण गंभीर जखमी झाला आहे. त्याला जवळच्या रुग्णालयात दाखल केले आहे. कार चालकाचे गाडीवरील नियंत्रण सुटल्यामुळे हा अपघात झाल्याची शक्यता व्यक्त होत आहे. या अपघातात मृत्यू झालेल्यांची नावे अजून मिळाली नाही. या प्रकरणी मंचर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पुढील तपास मंचर पोलीस करत आहेत.
पहाटे झालेल्या या अपघातानंतर महामार्गावरील वाहतूक व्यवस्था विस्कळीत झाली होती. मंचर येथील वाहतूक शाखेच्या पोलिसांनी घटनास्थळी धाव घेतली. त्यांनी रस्त्यावर असलेली अपघातग्रस्त वाहने क्रेनच्या मदतीने बाजूला केली. त्यानंतर पुणे-नाशिक मार्गावरील वाहतूक सुरळीत सुरु झाली.