योगेश बोरसे, पुणे, दि. 21 नोव्हेंबर | पुणे शहरातील वाढत्या गुन्हेगारीवर नेहमी चर्चा होत असते. पुण्यातील कोयता गँगचा मुसक्या आवळण्याचा प्रयत्न पोलिसांनी केला. त्यानंतरही रविवारी रात्री एका तरुणाचा कोयत्याने वार करुन खून करण्यात आला. त्याच रात्री दुसऱ्या घटनेत गोळीबार करुन एकाला जखमी करण्यात आले. एकीकडे ललित पाटील प्रकरणामुळे पुणे पोलिसांची प्रतिमा मलिन झाली असताना वाढत्या गुन्हेगारीमुळे पोलिसांवर टीका होत आहे. जून महिन्यात एकतर्फी प्रेमातून पुणे शहरात तरुणीवर हल्ला झाला होता. पुण्यातील त्या घटनेनंतर पुणे पोलीस अॅक्शन मोडमध्ये आले आहेत. पोलिसांनी एक अत्यंत महत्त्वाचा निर्णय घेतला आहे. मुलीवर कोयत्याने वार करणाऱ्या शंतनू लक्ष्मण जाधव याच्यावर ‘एमपीडीए’नुसार कारवाई करण्यात आली आहे.
पुणे शहरातील सदाशिव पेठेतील पेरू गेट जवळ जून महिन्यात हा प्रकार घडला होता. पोलीस चौकीपासून हाकेच्या अंतरावर महाविद्यालयीन तरुण आणि तरुणी गाडीवरून जात असताना शंतनू जाधव या आरोपीने त्यांना रोखले. तो त्या तरुणीशी बोलण्याचा प्रयत्न करत होता. परंतु तिने बोलण्यास नकार दिल्यामुळे त्याने सरळ कोयता काढला. त्यानंतर ती तरुणी धावू लागली. शंतनू तिच्यामागे कोयता घेऊन धावत होता. हा सर्व प्रकार भर रस्त्यात सुरु होता. एक तरुणाने शंतूनचा वार रोखल्यामुळे ती तरुणी बचावली. त्यावेळी पेरुगेट पोलीस चौकीवर एकही पोलीस नव्हता.
पुण्यातील सदाशिव पेठेत तरुणीवर कोयत्याने वार करणाऱ्या तरुणावर ‘एमपीडीए’नुसार कारवाई करण्यात आली आहे. आरोपी शंतनू लक्ष्मण जाधव याला एक वर्षासाठी नागपूर मध्यवर्ती कारागृहात स्थानबद्ध करण्यात आले आहे. पुणे पोलिस आयुक्त रितेश कुमार यांनी ही माहिती दिली. शंतनू याने एकतर्फी प्रेमातून तरुणीवर कोयत्याने वार करत तिला जखमी केले होते. काही दिवसानंतर न्यायालयाने त्याला जामीन मंजूर केला. त्यानंतरही त्याच्या वर्तनात सुधारणा झाली नव्हती. त्यामुळे त्याच्यावर ‘एमपीडीए’नुसार कारवाई करण्यात आली.