अभिजित पोते, पुणे | 7 नोव्हेंबर 2023 : चोरटे चोरी करण्यासाठी अनेक नवनवीन फंडे वापरत असतात. आपण पोलिसांना सापडू नये, याची पूर्ण काळजी ते घेत असतात. परंतु कधीतरी त्यांच्याकडून चूक होते आणि ते पोलिसांच्या सापळ्यात येतात. पुणे शहरातील एटीएममधून चोऱ्या करणाऱ्या दोघांना पकडण्यात पुणे वाहतूक शाखेच्या पोलिसांना यश आले आहे. गेल्या अनेक दिवसांपासून हे चोरटे विविध भागांत जाऊन एटीएममधून चोऱ्या करत होते. पोलिसांकडून एटीएममधून चोरी झाल्याच्या तक्रारी वाढत गेल्या. अखेर या चोरट्यांना पकडण्यासाठी पोलिसांनी सापळा रचला. त्या सापळ्यात दोघे जण अडकले. या प्रकरणी दोघांना अटक करण्यात आली आहे.
पुण्यातील विश्रामबाग पोलीस स्टेशनच्या हद्दीतील घटना उघड झाली. आरोपी उत्तर प्रदेशातील आहे. त्यांना अटक केल्यानंतर त्यांची चौकशी सुरु केली. त्यात त्यांनी शहरात अनेक ठिकाणी यापद्धतीने चोऱ्या केल्याचे सांगितले. तसेच उत्तर प्रदेशातही या चोऱ्या आम्ही करत होतो, हे त्यांनी सांगितले. अटक केली तेव्हा त्यांची ही या दिवस भरातील दुसरी चोरी होती. विश्रामबागपूर्वी त्यांनी शनिवार वाड्याजवळ असलेल्या एटीएममधून चोरी केली होती. दोघांकडून पुणे वाहतूक पोलिसांनी नऊ हजार पाचशे रुपयांची रक्कम देखील जप्त केली. ही कारवाई पुणे वाहतूक पोलिसांनी केली.
पुणे पोलिसांनी अटक केलेले दोन्ही आरोपी उत्तर प्रदेशातील आहे. हे दोन्ही जण एटीएममध्ये पैसे निघण्याच्या स्लॉटमध्ये एक प्लॅस्टीकची पट्टी लावत होते. ही पट्टी लावल्यानंतर एटीएममध्ये पिन टाकल्यावर पैसे मोजले जात होते. ते पैसे मशिनमधून बाहेर येत होते. परंतु या प्लास्टीकच्या पट्टीमुळे ते अडवले जात होते. ग्राहक बराच वेळ वाट पाहून पैसे निघून जात होता. ग्राहक निघाल्यावर हे दोघे एटीएममध्ये जाऊन ती प्लास्टीकची पट्टी काढून पैसे काढत होते. ग्राहकांच्या खात्यातून पैसे डेबिट होते होते, परंतु त्यांना ते मिळत नव्हते. यासंदर्भात अनेक तक्रारी आल्या होत्या, असे सहाय्यक पोलीस निरीक्षक कल्याणी पाडोळे यांनी सांगितले.