पुणे : पुण्यात परदेशी चलनाच्या नावाखाली अनेकांना गंडा घालण्यात आलाय. पुण्यातील बिबवेवाडी पोलिसांनी या टोळीचा पर्दाफाश केलाय. यूएईचे दीरहम चलन स्वस्तामध्ये देण्याच्या आमिषाने फसवणूक करणाऱ्या टोळीला बिबवेवाडी पोलिसांनी अटक केली. या टोळीने शहरात आठ ते दहा जणांची लाखो रुपयांची फसवणूक केल्याचे समोर आलंय. पुण्यासह देशातील विविध शहरांत या टोळीने असे गुन्हे केले आहेत.
महंमद उबईदुल्ला मुदसेर शेख (वय 30), पाखी सुबान मलिक (वय 27), बाबू फुलमिया मुल्ला (वय 32), उस्मान मुतलिफ अली (वय 27), महंमद कामरान खान (वय 28), रिदोई रहीम खान (वय 23) अशी अटक केलेल्या आरोपींची नावे आहेत. आरोपी देशातील विविध भागांतील राहणारे आहेत. त्यांचा महाजन नावाचा म्होरक्या असून, तोच गरीब-गरजू लोकांना सोबत घेऊन अशा पद्धतीने देशातील विविध शहरांत गुन्हे करीत आहे. अलीकडे शहरात त्यांनी यूएईचे दीरहम चलन देण्याच्या बहाण्याने फसवणूक करण्यास सुरुवात केली होती. या प्रकरणी आतापर्यंत तीन गुन्हे दाखल झाले असून, या टोळीने आठ ते दहा जणांची फसवणूक केल्याचे तपासात समोर आले आहे.
बिबवेवाडी येथील व्यावसायिकाला कमी किंमतीत दीरहम देण्याच्या आमिषाने तीन लाख रुपयांचा गंडा घालण्यात आला. या गुन्ह्यात बिबवेवाडी पोलीस या टोळीच्या मागावर होते. त्यावेळी ही टोळी शहरातील एका व्यक्तीला फसविणार असल्याची माहिती पोलिसांना मिळाली. त्यानुसार पोलिसांनी सापळा रचला. या टोळीने आठ ते दहा गुन्हे केल्याचे समोर आले आहे. त्यापैकी लोणीकंद येथे एक गुन्हा दाखल आहे. बिबवेवाडी पोलीस ठाण्यात दोन गुन्हे दाखल आहेत.
टोळीचा म्होरक्या महाजन साथीदारांची निवड करून, त्यांना एक मोबाईल आणि सीमकार्ड देत असे. तसेच त्यांना एक दीरहम देऊन ग्राहक शोधायला पाठवत असे. कार असलेल्या व्यक्तीजवळ जाऊन आरोपी त्यांना दीरहम चलन दाखवत. संबंधित व्यक्तीच्या आमिषाला बळी पडून, भारतीय चलनात पैसे देत असे, मात्र आरोपी त्याला साबणाच्या वडीला कागद गुंडाळून तो रुमालात बांधून देत. त्यानंतर आरोपी आपले सीमकार्ड आणि मोबाइल बंद करीत असत.
गुन्ह्यात मिळालेल्या पैशांपैकी टोळीच्या म्होरक्याला 30 टक्के, ग्राहक शोधणाऱ्याला 30 टक्के, साबणाची वडी देण्यासाठी गेलेल्याला 15 टक्के आणि लक्ष ठेवणाऱ्यांना 10 टक्के अशी पैशांची वाटणी केली जात होती. शहरात या टोळीने अनेकांना फसविल्याचे समोर येत आहे. पण, काही जणांनी तक्रारी केल्या नाहीत. नागरिकांची अशा पद्धतीने फसवणूक झाली असेल, तर त्यांनी पोलिसांत तक्रार करावी, असं आवाहन पोलिसांकडून करण्यात आलं आहे.
हेही वाचा :
10 हजारांची लाच घेताना झाडूवाल्यासह दोघे रंगेहाथ, पुणे महापालिकेत एसीबीची कारवाई
बापच बनला कंस, नवजात बाळाला हवेत फेकलं, छताला आपटून संपवलं, त्याने पोटच्याच मुलाला का मारलं?