Vanraj Aandekar Murder : पुणे शहरात दहशत निर्माण करणारी घटना पुन्हा एकदा घडली आहे. राष्ट्रवादी काँग्रेसचे माजी नगरसेवक वनराज आंदेकर यांची हत्या झाली. शहरातील गजबजलेल्या भागात हल्लेखोर चार ते पाच गाड्यांवरुन आले अन् एखाद्या चित्रपटाप्रमाणे वनराज आंदेकर यांच्यावर हल्ला सुरु केला. वनराज आंदेकर हल्लेखोरांना पाहताच पळू लागले. परंतु गाडीवरुन उतरत हल्लेखोरांनी गोळीबार सुरु केला. या घटनेचा सीसीटीव्ही फुटेज समोर आले आहे. त्यात 12 हल्लेखोर दिसत आहे. त्यात काही जणांकडे शस्त्र आहे.
पुणे पोलिसांनी या हत्या प्रकरणातील सीसीटीव्ही फुजेट जारी केले आहे. त्यात पाच ते सहा गाड्यांवर 12 युवक सोबत आलेले दिसत आहे. ते गाडीवरुन उतरुन वनराज आंदेकर यांच्या दिशेने जाऊ लागले. आपल्यावर हल्ला होणार हे कळताच आंदेकर जीव वाचवण्यासाठी पळू लागले. त्यावेळी एका हल्लेखोरांची गोळी त्यांच्या कानाजवळून गेली. आंदेकर रक्तबंबाळ झाल्यानंतर हल्लेखोरांनी हवेत गोळीबार केला. त्यानंतर घटनास्थळावरुन फरार झाले. चित्रपटात ज्या पद्धतीने गुंड हल्ला करुन पसार होतात, तिच पद्धत हल्लेखोरांची दिसली.
पुणे वनराज आंदेकर हत्या प्रकरणातील CCTV#punecrime pic.twitter.com/A19ftGXJvW
— jitendra (@jitendrazavar) September 2, 2024
वैयक्तिक वैमनस्य आणि वर्चस्वाच्या वादातून ही हत्या झाल्याची प्राथमिक माहिती पोलिसांनी दिली आहे. कारण वनराज आंदेकरच्या टोळीचा नाना पेठ परिसरात बराच वावर आहे. तो गुंड बंडू आंदेकर याचा मुलगा होता. घरगुती वादातून घडलेल्या या खुनाच्या घटनेला बंडू आंदेकर यांचा जावई गणेश कोमकर जबाबदार असल्याची माहिती सूत्रांनी दिली. काही वर्षांपूर्वी गणेश कोमकर याने शिवसेनेचे शहरप्रमुख रामभाऊ पारेख यांच्यावरही ॲसिड हल्ला केल्याचा आरोप केला होता.
वनराज आंदेकर हत्येमागे परिसरातील नाना पेठेतील सूरज ठोंबरे याचाही हात असल्याचा संशय पोलिसांना आहे. कारण गेल्या वर्षी ऑक्टोबरमध्ये पुण्यातील नाना पेठेत आंदेकर टोळीच्या गुंडांनी सूरज ठोंबरे टोळीतील दोघांवर हल्ला केला होता, त्यात दोन जण ठार झाले होते. आता वनराज आंदेकर यांच्यावर झालेल्या गोळीबारामुळे पुण्यातील गुन्हेगारी टोळीशी संबंधित वाढत्या कारवायांबाबत चिंता व्यक्त केली जात आहे. या वर्षाच्या सुरुवातीला कोथरूडमध्ये गँगस्टर शरद मोहोळ याचीही भरदिवसा गोळ्या झाडून हत्या करण्यात आली होती.