पुण्याच्या L3 हॉटेलचे 2 कर्मचारी पोलिसांच्या ताब्यात आले आहेत. पुणे ड्रग्ज प्रकरणात पोलिसांनी ही मोठी कारवाई केली आहे. पुणे हे विद्येचं माहेरघर मानलं जातं. पुणे शहराला राज्याची सांस्कृतिक राजधानी मानलं जातं. पण या सांस्कृतिक राजधानीत ड्रग्ज विक्रेत्यांचा सुळसुळाट बघायला मिळतोय. एका नामांकीत हॉटेलमध्ये अल्पवयीन मुलं ड्रग्ज घेतानाचा व्हिडीओ समोर आला आहे. संबंधित व्हिडीओ व्हायरल झाल्यामुळे एकच खळबळ उडाली आहे. व्हिडीओ समोर आल्यानंतर आता पोलिसांनी L3 हॉटेलमधील 2 कर्मचाऱ्यांना ताब्यात घेतल्याची माहिती समोर येत आहे. यामध्ये हॉटेलचा मॅनेजर आणि एका कर्मचाऱ्याचा समावेश असल्याची माहिती समोर येत आहे.
संबंधित प्रकाराचे व्हिडीओ समोर आल्यानंतर राज्य उत्पादन शुल्क विभागाचे अधीक्षक चरण सिंह राजपूत घटनास्थळी दाखल झाले. पुणे पोलिसांच्या गुन्हे शाखेचे सहायक पोलीस आयुक्त सतीश गोवेकर घटनास्थळी दाखल झाले. पुणे पोलिसांच्या गुन्हे शाखेचे वरिष्ठ अधिकारीदेखील घटनास्थळी पोहोचले. पुणे पोलीस तसेच गुन्हे शाखेच्या अंमली पदार्थ विरोधी पथकाकडून या संपूर्ण पार्टीचे विश्लेषण करण्यात आले. लिक्विड लीजर लाउंज L3 या हॉटेलमधील सीसीटीव्हीचे डीव्हीआर पुणे पोलिसांनी जप्त केले आहेत.
पुणे पोलीस L3 हॉटेल सील करण्याच्या तयारीत आहेत. ड्रग्स प्रकरणात L3 हॉटेल सील होण्याची शक्यता आहे. पुणे पोलीस आणि राज्य उत्पादन शुल्क विभागगकडून हे हॉटेल आता सील केलं जाणार आहे. पार्टी इथंच झाल्याचं तपासात उघड झाल्याची माहिती मिळत आहे. सीसीटीव्ही फुटेजच्या आधारे पोलिसांना महत्त्वाचे पुरावे मिळाल्याची माहिती मिळत आहे.
संबंधित प्रकार समोर आल्यानंतर काँग्रेस आमदार रवींद्र धंगेकर यांनी पोलीस आणि उत्पादन शुल्क मंत्री शंभूराज देसाई यांच्यावर गंभीर आरोप केले आहेत. पोलीस आणि उत्पादन शुल्क मंत्री हप्ते घेत असल्याने पुण्यातील अशा अनेक हॉटेल आणि बारमध्ये सर्रासपणे अंमली पदार्थांची विक्री केली जात असल्याचा आरोप रवींद्र धंगेकर यांनी केला आहे. त्यांच्या या आरोपांमुळे आता नवी खळबळ उडाली आहे. या आरोपांवर आता काय-काय कारवाई केली जाते, ते पाहणं महत्त्वाचं ठरणार आहे.