पुणे शहरातील कल्याणीनगरमध्ये बड्या व्यक्तीच्या अल्पवयीन मुलाने भरधाव पोर्श गाडी चालवत दोघांना उडवले. पुणे हिट अँड रन प्रकरणातील अल्पवयीन आरोपीचा वडील विशाल अग्रवाल याला 14 दिवसांची न्यायालयीन कोठडी सुनावण्यात आली आहे. या प्रकरणातील पुणे पोलिसांच्या भूमिकेवर प्रश्न उपस्थित केले जात आहे. यानंतर आता पुणे पोलिसांनी कठोर पावले उचलली आहेत. या प्रकरणात वरिष्ठांना माहिती न देणाऱ्या अधिकाऱ्यांचे निलंबन केले आहे. पोलीस निरीक्षक राहुल जगदाळे आणि विश्वनाथ तोडकरी अशी अधिकाऱ्यांची नावे आहेत. तपास आता गुन्हे शाखेकडे देण्यात आला आहे. तसेच पुणेकरांना विशाल अग्रवाल आणि त्यांच्या कुटुंबियासंदर्भात काही तक्रार असल्यास पोलिसांशी संपर्क साधण्याचे आवाहन करण्यात आले आहे. पोलिसांप्रमाणे राज्य उत्पादन शुल्क विभागाने कारवाई केली आहे.
पुणे पोलीस आयुक्त अमितेश कुमार यांनी येरवडा पोलीस ठाण्यातील दोन अधिकाऱ्यांचे निलंबन केले. तपासात दिरंगाई आणि अपघाताची माहिती वेळेत वरिष्ठांना दिली नाही, असा ठपका ठेवत पोलीस निरीक्षक राहुल जगदाळे आणि विश्वनाथ तोडकरी यांच्यावर कारवाई केली.
पुणे येथील या चर्चेतील अपघात प्रकरणाचा तपास गुन्हे शाखेकडे वर्ग करण्यात आला आहे. येरवडा पोलीस ठाण्यात असलेला अपघाताचा गुन्हा आता गुन्हे शाखेकडे देण्यात आला आहे. पुणे पोलिसांच्या गुन्हे शाखेकडून अपघाताचा तपास करण्यात येणार आहे. येरवडा पोलीस ठाण्याच्या सहायक पोलिस आयुक्त आरती बनसोडे यांच्याकडून तपास काढून घेण्यात आला आहे. गुन्ह्याची व्याप्ती वाढल्यामुळे तसेच येरवडा पोलिसांच्या भूमिकेबद्दल संशय निर्माण झाल्यामुळे पोलीस आयुक्तांनी हा निर्णय घेतला.
पुणे पोलिसांनी अग्रवाल कुटुंबियांकडून कोणाला त्रास झाला आहे, त्याची माहिती काढण्याचे काम सुरु केले आहे. अग्रवाल कुटुंबियांच्या विरोधात अनेक तक्रारी पुणे पोलिसांना प्राप्त झाल्या आहेत. या सगळ्या तक्रारींचा तपास पुणे पोलीस करण्याची शक्यता आहे. तसेच या पार्श्वभूमीवर पुणे पोलिसांनी नागरिकांना जाहीर आवाहन केले आहे. त्यात कुठल्या ही नागरिकाला अग्रवाल कुटुंबियासंदर्भात तक्रार दाखल करायची असेल तर त्याने पोलीस ठाणे किंवा गुन्हे शाखेला तक्रार द्यावी, असे आवाहन पोलिसांनी केले आहे.
पुणे शहरात चौथी कारवाई राज्य उत्पादन शुल्क विभागाकडून झाली आहे. पुणे शहरात आणखीन 17 बार आणि पब्सवर कारवाई करण्यात आली आहे. शहरातील 17 बारचे परवाने करण्यात आले निलंबित करण्यात आली आहे. राज्य उत्पादन शुल्क विभागाने ही कारवाई केली आहे. नियम मोडणाऱ्या पब्स आणि बारवर राज्य उत्पादन शुल्क विभागाकडून कारवाई झाली आहे. 4 दिवसांत एकूण 49 बार आणि पब्सचे परवाने राज्य उत्पादन शुल्क विभागाकडून निलंबित करण्यात आले आहे. शहरात राज्य उत्पादन शुल्क विभागाच्या 14 पथकांकडून कारवाई होत आहे.