अभिजीत पोते, Tv9 मराठी, पुणे | 29 सप्टेंबर 2023 : पुण्यात पुन्हा एकदा गुन्हेगारी उफाळून बाहेर आलीय. पुण्यात गुन्हेगारीच्या घटना सातत्याने वाढत आहेत. विशेष म्हणजे या घटनांनी आज उच्चांक गाठलाय. कारण पुण्यात आज चक्क एका निवृत्त पोलिसाच्या मुलाची निर्घृणपणे हत्या करण्यात आलीय. त्यामुळे एकच खळबळ उडाली आहे. सिंहगड रोड पोलीस ठाण्यात संबंधित हत्येची घटना घडली आहे. विजय ढुमे असं हत्या करण्यात आलेल्या निवृत्त पोलिसाच्या मुलाचं नाव आहे.
मृतक विजय ढुमे हे सिंहगड रोड परिसरातील एका लाँजमधून बाहेर येत होता. यावेळी एका टोळक्याने त्यांच्यावर हल्ला केला. विजय ढुमे लाँजमध्ये गेल्यानंतर आरोपींचं टोळकं तिथे दबा धरुन बसला होता. विजय बाहेर येताच दबा धरुन बसलेल्या टोळक्याने हल्ला केला. या हल्ल्यात विजय यांचा जागीच मृत्यू झालाय. जवळपास 4 ते 5 जणांनी मिळून ही हत्या केलीय.
विजय ढुमे हे सेवानिवृत्त पोलिसाचा चिरंजीव होते. त्यांचे अनेक बड्या पोलीस अधिकार्यांशी मैत्रीचे संबंध आहेत. तसेच अनेक राजकारणी व्यक्तींशी त्यांचे चांगले संबंध आहेत. विजय ढुमेंच्या हत्येने पुण्यात खळबळ उडाली आहे. दरम्यान, हत्येच्या घटनेची माहिती मिळाल्यानंतर सिंहगड रोड पोलीस ठाण्याचे पोलीस अधिकारी आणि कर्मचारी घटनास्थळी दाखल झाले आहेत. पोलिसांकडून आरोपींचा शोध सुरु करण्यात आलाय. आरोपींनी ही हत्या का केली? याचा पोलीस शोध घेणार आहेत.