प्रदीप कापसे, पुणे | 8 ऑगस्ट 2023 : पुणे शहरात १८ जुलै रोजी पुणे पोलिसांनी दोन दशतवाद्यांना अटक केली होती. एका मोटारसायकल चोरीच्या प्रकरणात सापडलेले हे दोघे दहशतवादी निघाले. राष्ट्रीय तपास संस्थेच्या मोस्ट वॉटेंड दहशतवाद्यांच्या यादी ते होते. इम्रान खान आणि मोहम्मद युनूस साकी अशी त्यांची नावे आहेत. या प्रकरणाचे गांभीर्य लक्षात घेऊन तपास एटीएसकडे देण्यात आला. त्यानंतर या दोघांना मदत करणारा अब्दुल कादीर दस्तगीर पठाण आणि सिमाब नसरुद्दीन काझी यांनाही एटीएसने अटक केली. तसेच मुंबईच्या कारागृहात असलेल्या झुल्फीकार अली बडोदावाला यालाही अटक केली.
पुणे दहशतवादी तपास आता एटीएसकडून एएनआयकडे देण्यात आला आहे. या दहशवाद्यांचे इसिस आणि अल सुफा या दहशवादी संघटनांशी असलेल्या संबंधामुळे हा तपास एनआयएकडे दिला आहे. त्यासाठी न्यायालयीन प्रक्रिया सुरु केली आहे. या प्रकरणात डॉ अदनान अली बडोदेवाला याने दहशतवाद्यांना आर्थिक रसद पुरवल्याचे तपासात समोर आले आहे. बडोदेवाला याला इसिसशी संबंधामुळे एनआयएने यापूर्वी अटक केली आहे. तो मुंबई येथील आर्थररोड कारागृहात आहे.