पुण्यातील नाना पेठेत राष्ट्रवादी काँग्रेसचे माजी नगरसेवक वनराज आंदेकर यांचा खून झाला. हा खून कौटुंबिक वादातून झाल्याचे स्पष्ट झाले आहे. पोलिसांनी या प्रकरणात एकूण 15 जणांवर गुन्हा दाखल केला आहे. त्यात वनराज आंदेकर याची सख्खी बहीण आणि मेहुणे आहेत. हल्लेखोर वनराज आंदेकर याच्यावर हल्ला करत होते, त्यावेळी त्याची बहीण संजीवन गॅलरीत थांबली होती. गॅलरीतून ती हल्लेखोरांना चिथावणी देत होती. मारा, मारा…सोडू नका, असे चिथावणी तिने दिल्याचे फिर्यादीत म्हटले आहे.
आरोपी संजीवनी आणि तिचा पती जयंत कोमकर यांनी पोलिस ठाण्यात आकाश परदेशी याच्याशी वाद झाला. त्यावेळी पोलीस ठाण्यात शिवीगाळ केली. हा वाद सोडवण्यासाठी वनराज आंदेकर आणि त्याचा चुलत भाऊ शिवम यांनी मध्यस्थी केली. त्यावेळी कोमकर यांनी वनराज आंदेकर याला धमकी दिली. तू आमच्या दुकानावर कारवाई करण्यास सांगितले आहे. आमच्या पोटावर पाय दिला आहे. तुला आज पोरं बोलावून ठोकणार…, असे सूर्यकांत आंदेकर यांनी दिलेल्या फिर्यादीत म्हटले आहे.
आरोपींनी कट रचून साथीदारांना नाना पेठेत बोलावले. रविवारी १ सप्टेंबर रोजी रात्री नऊच्या सुमारास वनराज आंदेकर आणि त्यांचा चुलत भाऊ शिवम गप्पा मारत थांबले होते. त्यावेळी एका दुचाकीवरून तिघे जण आले. त्यानंतर आणखी काही जण आले. शिवम आणि वनराज यांच्या समोर आरोपी थांबले. मग पवन कतराल याने कमरेला लावलेले पिस्तूल काढून गोळी झाडली. त्यानंतर समीर काळे यानेही फायरिंग केली. या वेळी वनराज आणि शिवम पळून जात होते. आरोपींनी वनराज यांना गाठले. त्याच्यावर पिस्तुलातून पाच ते सहा गोळ्या झाडल्या. त्यानंतर कोयत्याने वार केले.
वनराज आंदेकर खून प्रकरणात पोलिसांनी सख्खी बहीण संजीवनी कोमकर आणि मेहुणा जयंत कोमकर, भाचा प्रकाश जयंत कोमकर, गणेश लक्ष्मण कोमकर, सोमनाथ सयाजी गायकवाड, अनिकेत दुधभाते, तुषार ऊर्फ आबा कदम, सागर पवार, पवन करताल, समीर ऊर्फ सॅम काळे यांच्यासह सुमारे पंधरा जणांवर गुन्हा दाखल केला आहे. या प्रकरणी वनराज आंदेकर याचे वडील सूर्यकांत आंदेकर यांनी समर्थ पोलिस ठाण्यात फिर्याद दिली आहे.