पुणे | 21 ऑक्टोंबर 2023 : पुणे शहरात फसवणुकीचे वेगवेगळे प्रकार घडत आहे. कधी ऑनालाइन टास्क देऊन फसवणूक केली जाते तर कधी ओटीपी घेऊन मोबाईल हॅक केला जात आहे. फसवणुकीच्या या प्रकारात एका ज्येष्ठ व्यक्तीला वेगळाच अनुभव आला. एका ओळखीच्या महिलेने त्यांची दुसऱ्या महिलेशी ओळख करुन दिली. त्यानंतर ते एकमेकांना भेटले. फोन नंबर घेतले. पुढे मात्र त्या 74 वर्षीय व्यक्तीची दोघांकडून फसवणूक सुरु झाली. अगदी 30 लाख रुपयांत ही फसवणूक झाली. या प्रकरणी गुन्हा नोंदवण्यात आला असून दोघांना अटक करण्यात आली आहे.
पुणे येथील 74 वर्षीय व्यक्तीची ओळख ज्योती बनसोडे हिच्याशी होती. ज्योती बनसोडे हिने मार्केट यार्डमध्ये राहणाऱ्या एका महिलेची ओळख त्यांच्याशी करुन दिली. जुलै महिन्यात ही ओळख झाली. त्यानंतर त्यांनी एकमेकांचे फोननंबर घेतले. त्या भेटीच्या काही दिवसांनी ज्योती बनसोडे हिने त्यांना संपर्क केला. तिने सांगितले की, तुम्ही ज्या महिलेला भेटले तिला पोलिसांनी वेश्या व्यवसाय करताना पकडले आहे. या प्रकरणात तुमचे नाव येणार आहे. तुमचा क्रमांक पोलिसांना तिच्या मोबाइलमध्ये मिळाला आहे. पोलीस तुमच्याविरुद्ध कारवाई करणार आहे. कारवाई थांबवण्यासाठी पैसे द्यावे लागतील.
74 वर्षीय व्यक्तीने त्यांना पैसे दिले. परंतु त्यांच्याकडून आणखी पैशांची मागणी होत होती. थोडे दिवस गेले की ते सतत पैसे मागत होते. त्यांच्याकडून ज्योती बनसोडे आणि रामचंद्र कोरडे यांनी 30.3 लाख रुपये घेतले. त्यानंतर पैसे मागणे थांबले नाही. यामुळे अखेर त्यांनी मार्कट यार्ड पोलिसात तक्रार दिली. त्यानंतर पोलिसांनी दोघ आरोपीविरुद्ध भारतीय दंड विधान 419, 420 आणि 384 नुसार गुन्हा दाखल केला.
दोघांना पोलिसांनी अटक केली. आरोपींना न्यायालयात हजर करण्यात आले. न्यायालयाने त्यांना 23 ऑक्टोबरपर्यंत पोलीस कोठडी सुनावली. तपास सहायक पोलीस निरीक्षक स्वप्नील शिंदे करत आहे. पुण्यात ज्येष्ठांना फसवणुकीच्या घटना वाढत असल्यामुळे चिंता व्यक्त केली जात आहे.