पुणे शहरातील युवकाची अमेरिकेत मोठ्या जहाज कंपनीवर निवड झाली होती. अमेरिकेत जहाजावर डेस्क कॅडेट म्हणून तो रुजूही झाला होता. परंतु अमेरिकेतून तो ५ एप्रिलपासून बेपत्ता झाला आहे. कंपनीने तुमचा मुलगा बेपत्ता झाला असून त्याचा शोध घेतला जात असल्याचे कळवले होते. त्यानंतर मात्र काहीच माहिती कंपनीकडून दिली जात नसल्याने मुलाचे पालक धास्तावले आहेत. त्यांनी पुणे येथील वारजे पोलीस ठाण्यात तक्रार दिली आहे. प्रणव गोपाळ कराड असे बेपत्ता झालेल्या युवकाचे नाव आहे.
प्रणव कराड याच्या वडिलांनी वारजे पोलिसांकडे दिलेल्या तक्रारीत म्हटले आहे की, प्रणव हा पुण्यातील एमआयटीमध्ये शिक्षण घेत होता. त्याची निवड विल्हेल्मसेन शिप मॅनेजमेंट या अमेरिकेतील कंपनीत झाली होती. तो अमेरिकेत ज्वाईन होण्यासाठी गेला होता. जहाजावर डेस्क कॅडेट म्हणून तो काम करु लागला. परंतु ५ एप्रिल रोजी कंपनीकडून तो हरवल्याचा फोन आला. त्यानंतर या संदर्भात ६ एप्रिल रोजी मेल आला. परंतु त्यानंतर कंपनीकडून काहीच माहिती दिली जात नाही.
विल्हेल्मसेन शिप मॅनेजमेंट कंपनीकडून प्रणव याच्या सहकारी आणि मित्रांचे मोबाईल क्रमांक देण्यास नकार दिला आहे, असा आरोप त्यांनी केला. या प्रकरणात परराष्ट्र मंत्रालय, जहाजबांधनी मंत्रालयाशी संपर्क करुन मुलाचा शोध घ्यावा, अशी मागणी गोपाळ कराड यांनी केली आहे.
विल्हेल्मसेन शिप मॅनेजमेंट या कंपनीची 1861 मध्ये नॉर्वेमध्ये स्थापन झाली आहे. कंपनी जहाजांना क्रू आणि तांत्रिक व्यवस्थापन पुरवते. कंपनीचे जवळपास 60 देशांमध्ये हजारो कर्मचारी आहेत. त्यामुळे प्रणव कराड या कंपनीत रुजू होण्यासाठी गेला होता. तो बेपत्ता झाल्याचा मेल कंपनीकडून कुणाल यांनी ६ एप्रिल रोजी केला. परंतु त्यानंतर काहीच माहिती दिली जात नसल्यामुळे प्रणव यांचे कुटुंबीय हादरले आहे. मुलाच्या शोध घेण्यासाठी त्यांनी पोलिसांकडे धाव घेतली आहे.