पुणे : दौंड शहरात सध्या दरोडेखोरांनी प्रचंड धुमाकूळ घातला आहे. विशेष म्हणजे दौंड पोलीस ठाण्याचे नाईक अण्णासाहेब देशमुख यांच्या घरात घुसून दरोडेखोरांनी त्यांच्यावर वार केले. दरोडेखोरांनी पोलीस नाईकांचे ओठ आणि दातांचा खालील भाग जखमी केला. तसेच्या त्यांच्या पाठीवरही लोखंडी रॉडने वार केला. पोलीस नाईक घरात झोपले असताना त्यांनी मोठ्या चालाखीने दरोडा टाकला. त्यांनी अण्णासाहेबांच्या पत्नीचे दागिने आणि कपाटात ठेवलेली 70 हजारांची रोख रक्कम लांबवली. या घटनेमुळे शहरात एकच खळबळ उडाली आहे. तसेच परिसरातील नागरिकांमध्ये भीतीचं वातावरण आहे.
दौंड शहरातील गोपाळवाडी रोड परिसरातील भवानीनगर, गजानन सोसायटी, शिवराज नगर भागामध्ये 5 दरोडेखोरांनी मध्यरात्री काही घरांवर दरोडा टाकला. यामध्ये इंदापूर तालुक्यातील भवानीनगर येथे राहणाऱ्या दौंड पोलीस कर्मचाऱ्याच्या घराचा देखील समावेश आहे. दरोडेखोरांनी रात्री 3 वाजेच्या सुमारास दरोडा टाकत बंगल्यात प्रवेश करून घरातील रोख रक्कम, दागिने असा 1 लाख 30 हजार रुपयांचा ऐवज चोरुन नेला. तर इतर ठिकाणी देखील दरोडेखोरांनी दरोडा टाकत 3 लाखांची चोरी केली. विशेष म्हणजे हा सगळा प्रकार सीसीटीव्ही फुटेजमध्ये कैद झाला आहे. पुणे जिल्हा ग्रामीणच्या स्थानिक गुन्हे शाखेच्या पथकानेही घटनास्थळी येऊन संपूर्ण परिसर पिंजून काढला. यावेळी श्वान पथकालाही पाचारण करण्यात आले आहे. पण दरोडेखोरांची इतकी मोठी हिंमत कशी होऊ शकते? असा सवाल परिसरातील नागरिकांकडून उपस्थित केला जातोय.
दौंड पोलीस ठाण्याचे पोलीस नाईक अण्णासाहेब देशमुख यांच्या बंगल्याबाहेर रात्री अडीच वाजेच्या सुमारास पाच दरोडेखोर दाखल झाले. त्यांनी आधी लोखंडी दरवाजा खोलला. त्यानंतर त्यांनी लाकडी दरवाजाही उचकटून टाकत घरात प्रवेश केला. यावेळी पोलीस नाईक देशमुख हे आतमध्ये झोपले होते. याच गोष्टींचा फायदा घेत त्यांनी देशमुख यांच्या थेट तोंडावर लोखंडी रॉडने हल्ला केला. त्यानंतर देशमुख कुटुंबाला जाग आली.
दरोडेखोरांनी देशमुखांना घेरत त्यांच्या पाठीवर वार केले. त्यानंतर घरातील पैसे देण्यास सांगितले. तसेच देशमुख यांच्या पत्नीच्या गळ्यातील मंगळसूत्र आणि कानातील दागिने काढायला सांगितले. यावेळी दरोडेखोरांनी देशमुख कुटुंबाकडून दागिन्यांसह कपाटातील 70 हजार रोख रक्कम पळवून नेली. या घटनेत देशमुख जखमी झाले. पण त्यांची प्रकृती आता स्थिर आहे.
दरोडेखोर या घटनेआधी दोन वाजेच्या सुमारास गजानन सोसायटीतील कमल तुपेकर यांच्या बंगल्याच्या वरच्या मजल्यातील खोलीत शिरले होते. यावेळी दरोडेखोरांनी कमल तुपेकर आणि वनिता तुपेकर यांचे तोंड दाबून त्यांच्या गळ्यातील दागिने हिसकावले होते. तसेच त्यांच्या पर्समधून सहा हजार रुपये पळवून नेले होते. या दरोडेखोरांनी जवळपास तीन ठिकाणी दरोडा टाकला आणि दोन ठिकाणी घरफोडी केली, अशी माहिती समोर आली आहे. पोलिसांनी या घटनांची गांभीर्याने दखल घेतली आहे. विशेष म्हणजे दरोडे सीसीटीव्हीत कैद झाले आहेत. त्यामुळे त्यांना पोलीस लवकर बेड्या ठोकतील अशी आशा आहे.
हेही वाचा :
औरंगाबादेत गांजाची शेती, 303 झाडांसह 9 लाख रुपये जप्त, गुन्हा दाखल
चालत्या कारची स्टेअरिंग अचानक लॉक झाली आणि महिला डॉक्टरने जीव गमावला, नेमकं काय घडलं ‘त्या’ रात्री?