Pune Crime News: पुणे शहरातील बांधकाम व्यवसायिकाची चार कोटी रुपयांमध्ये फसवणूक करणारी बिहारची गुडियाला अटक करण्यात आली आहे. गुडिया उर्फ सानिया सिद्दिकी नावाची ही २३ वर्षीय मुलगी गेल्या सहा महिन्यांपासून फरार होती. पोलिसांच्या तावडीतून फरार झाल्यामुळे सहा पोलिसांचे निलंबन झाले होते. अखेर पुणे पोलिसांच्या पथकाने बिहारमध्ये जाऊन एखाद्या चित्रपटातील दृश्याप्रमाणे तिच्या मुसक्या आवळल्या. सानिया ही बिहारची गुडिया म्हणून कुप्रसिद्ध आहे.
पुण्यातील व्यवसायिकाची चार कोटींमध्ये गुढियाने फसवणूक केली होती. सानिया सिद्दिकी नावाच्या या मुलीने पुण्यातील एका बांधकाम व्यवसायिकाचा नंबर घेऊन आपण व्यावसायिक बोलत आहे, असे सांगून चार कोटी रुपयांमध्ये फसवणूक केली. फेब्रुवारी महिन्यात पुण्यातील बांधकाम व्यावसायिकाचा नंबर तिने वापरला. तिने आपण तो बांधकाम व्यावसायिकच बोलत असल्याचे भासवले. ‘मी परदेशात आहे, काही पैसे पाठव’ असे सांगत संबंधित कंपनीच्या अकाउंटंला सांगितले. त्यामुळे त्या अकाउंटंटने कंपनीच्या खात्यातून तिने सांगितलेल्या खात्यावर ४ कोटी रुपये पाठवले होते. तिला अटक करण्यात आली होती. परंतु फेब्रुवारी महिन्यात सहा पोलिसांच्या तावडीतून ती फरार झाली. गेल्या १० महिन्यांपासून ती साडत नव्हती. अखेर बिहारमधून तिला पुणे पोलिसांच्या सायबर पोलिसांनी अटक केली.
पुणे पोलिसातील जिगरबाज महिला पोलिसांनी आठ दिवस बिहारमध्ये ठाण मांडून तिचा शोध लावला. बिहारमधील फरीदाबादमधून सानिया सिद्दिकी उर्फ बिहारची गुडिया हिला अटक केली. त्याबाबत पुणे सायबर क्राईम पोलीस निरीक्षक स्वप्नाली शिंदे यांनी सांगितले की, सानियाबाबत गुप्त माहिती मिळाल्यानंतर आम्ही बिहारमधील गोपलागंजमध्ये गेलो. त्या ठिकाणी एका शेतातील ती घरात राहत असल्याचे समजले. त्या ठिकाणी रेकी केली. तिच्यावर लक्ष ठेवले. त्यानंतर स्थानिक पोलिसांना सोबत घेतले. त्या घरावर छापा मारला. त्यावेळी ती गच्चीवर होती. तिने पळून जाण्याचा प्रयत्न केला. परंतु पीएसआय कदम यांनी तिला ताब्यात घेतले.
सानिया सिद्दिकी अगदी चालख आहे. ती फक्त २३ वर्षांची आहे. तिच्या नावावर एकही सीमकार्ड नाही. तसेच कोणत्याही सोशल मीडियावर तिचे अकाउंट नाही. त्यामुळे तिचा शोध घेणे अवघड गेल्याचे स्वप्नाली शिंदे यांनी सांगितले.