पुण्यातील भाजपचे विधान परिषदेचे आमदार योगेश टिळेकर यांचे मामा सतीश वाघ यांच्या अपहरण आणि हत्येच्या घटनेचा उलगडा करण्यात पोलिसांना मोठं यश आलं आहे. पोलिसांचे जवळपास 16 विविध पथकं या प्रकरणात तपास करत होते. पोलिसांनी तपासादरम्यान एकाच दिवसांत तब्बल 450 पेक्षा जास्त सीसीटीव्ही फुटेज तपासले. अखेर या तपासात पोलिसांना मोठं यश आलं. पोलीस सतीश वाघ यांच्या मारेकऱ्यांपर्यंत जावून पोहोचले. सतीश वाघ हे खरंतर राजकारणात नाहीत. ते व्यवसाय करतात. त्यांचं कुणाशी वैरही नाही. तरीही त्यांचं अपहरण करुन हत्या कुणी केली असेल? असा प्रश्न उपस्थित केला जात होता. या घटनेमुळे संपूर्ण पुणे शहर हादरलं होतं. अखेर सतीश वाघ यांच्या हत्येमागे नेमकं कोण होतं ते स्पष्ट झालं आहे.
सतीश वाघ यांच्या शेजारी राहणाऱ्या व्यक्तीने त्यांच्या हत्येची सुपारी दिली होती, अशी धक्कादायक माहिती आता पोलीस तपासातून उघड झाली आहे. शेजारी राहणाऱ्या इसमाने सतीश वाघ यांच्या हत्येसाठी 5 लाख रुपयांची सुपारी दिली होती. पुण्याचे पोलीस आयुक्त अमितेश कुमार यांनी या घटेनाबाबत मोठा खुलासा केला आहे.
या घटनेतील एकूण चार आरोपींना अटक करण्यात आली आहे. यामध्ये गाडीत ज्या 4 आरोपींनी सतीश वाघ यांची निर्घृण हत्या केली त्यापैकी 3 आरोपींना पोलिसांनी अटक केली आहे. तर यातील 1 आरोपी फरार आहे. पुणे पोलिसांकडून त्या फरार आरोपीचा शोध सुरु आहे. पुणे पोलिसांकडून या हत्येचं गूढ उकलण्यात आलं आहे. सतीश वाघ यांच्या शेजारील व्यक्तीने वैयक्तिक वादातून त्यांच्या हत्येची सुपारी दिल्याची माहिती समोर येत आहे. सतीश वाघ यांच्या शेजारी राहणाऱ्या व्यक्तीने 5 लाख रुपयांची सुपारी दिली होती, अशी माहिती समोर आली आहे. पोलिसांनी सुपारी देणाऱ्या शेजाऱ्याला देखील अटक केली आहे. चारही आरोपींवर कठोर गुन्हे दाखल करण्यात आले आहेत, अशी माहिती पुणे पोलीस आयुक्तांनी दिली आहे.
पुण्याचे पोलीस आयुक्त अमितेश कुमार यांनी या प्रकरणावर प्रतिक्रिया दिली आहे. “पुणे क्राईम ब्रांच आणि स्थानिक पोलिसांनी अतिशय युद्ध पातळीवर या गुन्ह्याचा तपास केला आहे. अजूनही तपास सुरु आहे. सुरुवातीला घटना घडल्यापासून वेगवेगळे पथक या प्रकरणात काम करत होते. पोलिसांनी तपासाच्या पहिल्याच दिवशी 450 ठिकाणच्या सीसीटीव्ही फुटेज तपासले होते. त्या आधारावर पोलिसांनी जलद गतीने तपास करत अपहरण करताना वापरलेली गाडी ताब्यात घेतली. त्यानंतर हळूहळू आरोपी पोलिसांच्या हाती लागले. पोलीस या प्रकरणी ठोस पुरावे गोळा करत आहेत. या प्रकरणात ज्या व्यक्तीने 5 लाखांची सुपारी दिली होती त्याची चौकशी सुरु आहे. आरोपीला कठोर शिक्षा होईल या दृष्टीने पोलीस अत्यंत मेहनतीने काम करत आहेत”, अशी प्रतिक्रिया पुणे पोलीस आयुक्त अमितेश कुमार यांनी दिली.