पुण्यातील सर्व टेकड्यांवर बसवणार ‘सर्च लाईट’, सायरन सुद्धा असणार, कारण…

| Updated on: Oct 06, 2024 | 3:37 PM

Pune Police: पोलिसांनी घाट आणि टेकड्यांवर सर्च लाईट बसवण्याचा महत्त्वाचा निर्णय घेतला. तसेच शहरातील सर्व टेकड्यांवर सायरन सुद्धा बसवले जाणार आहेत. आपत्कालीन परिस्थितीत हा सायरन महत्वाचा ठरणार आहे.

पुण्यातील सर्व टेकड्यांवर बसवणार सर्च लाईट, सायरन सुद्धा असणार, कारण...
पुणे शहरातील टेकड्यांवर सर्च लाईट बसवणार
Follow us on

पुणे शहर संस्कृतीचे शहर होते. यामुळे ‘पुणे तिथे काय उणे’ ही म्हण प्रचलित झाली. परंतु गेल्या काही वर्षांपासून पुणे शहराचा विस्तार मोठ्या प्रमाणावर झाला. पुणे शहरात औद्योगिक कंपन्या आल्या. त्यानंतर त्या कंपन्यांमध्ये काम करण्यासाठी देशभरातून कामगार पुण्यात आले. मग पुणे शहर माहिती अन् तंत्रज्ञानाची नगरी झाली अन् देशभरातून सॉफ्टवेअर अभियंते पुण्यात आले. त्यामुळे हळूहळू पुणे शहराची संस्कृती हरवत चालली आहे की काय? असा प्रश्न निर्माण होऊ लागला आहे. गेल्या पाच ते सात दिवसांत पुण्यात अत्याचाराच्या चार घटना उघड झाल्या आहेत. पुणे शहरातील गुन्हेगारी वाढली आहे. यामुळे पुणे पोलिसांनी आता शहरातील टेकड्यांवर आणि घाटांमध्ये सर्च लाईट बसवण्याचा निर्णय घेतला आहे. या टेकड्यांवर सायरनसुद्धा असणार आहेत.

पुण्यातील सर्व टेकड्यांवर “सर्च लाईट” बसवण्याचा निर्णय पुणे पोलिसांनी घेतला आहे. ३ ऑक्टोंबर रोजी बोपदेव घाटात एका २१ वर्षीय युवतीवर तिघांनी सामुहिक अत्याचार केला होता. त्या प्रकरणामुळे पुणे हादरले आहे. या प्रकरणातील तिन्ही आरोपींना अजून पकडण्यात पुणे पोलिसांना यश आले नाही. या प्रकरणानंतर पुणे पोलिसांनी घाट आणि टेकड्यांवर सर्च लाईट बसवण्याचा महत्त्वाचा निर्णय घेतला. तसेच शहरातील सर्व टेकड्यांवर सायरन सुद्धा बसवले जाणार आहेत. आपत्कालीन परिस्थितीत हा सायरन महत्वाचा ठरणार आहे.

बाणेर टेकडीवर झाली होती लूट

काही दिवसांपूर्वी पुण्यातील बाणेर टेकडीवर एका तरुणाला काही चोरट्यांनी लुटले होते. पुण्यातील टेकड्यांवर होणाऱ्या चोऱ्या आणि लूट थांबवण्यासाठी आता पोलिसांकडून मोहीम सुरू करण्यात आली आहे. गुन्हेगार गुन्हे करण्यासाठी निर्जन स्थळ शोधतात. त्यामुळे गुन्हेगारांना गुन्हे करण्यासाठी कोणतीही जागा लावू नये, यासाठी पोलिसांनी पावले उचलली आहे.

हे सुद्धा वाचा

सीसीटीव्ही कॅमेरे लावावेत

पुणे शहरातील वाढती गुन्हेगारीमुळे विधानपरिषद उपसभापती डॉ. नीलम गोऱ्हे यांनी पोलिसांना उपाययोजना करण्याचे निर्देश दिले. निर्जनस्थळी पोलीस चौकी अद्यावत करावी, सीसीटीव्ही कॅमेरे लावावेत, गस्त वाढवावी, तसेच वेळोवेळी सायरनचा वापर करावा, असे आदेश डॉक्टर गोऱ्हे यांनी दिले.

बोपदेव घाट बलात्कार प्रकरणात 100 जणांची चौकशी

बोपदेव घाट बलात्कार प्रकरणात पोलिसांनी 100 पेक्षा जास्त संशयिततांची चौकशी केली. पुणे शहरातील सगळे डिटेक्टिव ब्रँच पोलीस आरोपींच्या शोधात आहेत. शहरातील सगळ्या रेकॉर्डवरच्या गुन्हेगार तपासणीचे काम हाती घेण्यात आले आहे. सगळ्या बाजूंनी 50 किलोमीटरपर्यंतच्या परिसरातल्या सीसीटीव्ही फुटेज चेक करण्यात येत आहे.