पुणे – ‘हम यहां के भाई है’ असे म्हणत एका दुकानदाराला मारहाण करून दररोजचा 200 रुपये हप्ता मागणाऱ्या दोन आरोपींना खडकी पोलिसांनी अटक केली आहे. शिवाजीनगर येथील पाटील इस्टेट या ठिकाणी ही घटना घडली आहे. याबाबत एका 35 वर्षीय व्यक्तीने फिर्याद दिली आहे. तौसीफ सलीम शेख (वय- 19, रा. शिवाजीनगर, पुणे) अल्ताफ मोहम्मद शेख (वय-19, रा. पाटील इस्टेट, शिवाजीनगर, पुणे) व आणखी एकावर खडकी पोलीस स्टेशन येथे गुन्हा दाखल करण्यात आला असून, आरोपी तौसीफ व अल्ताफ यांना अटक करण्यात आली आहे.
नेमके काय झाले
पोलिसांनी दिलेलया माहितीनुसार, पाटील इस्टेट या ठिकाणी फिर्यादी यांचे महालक्ष्मी प्रोव्हीजन स्टोअर्स नावाचे दुकान आहे. फिर्यादी व त्यांचा कामगार दुकानावर असताना वरील आरोपींनी फिर्यादींना दररोजचा 200 रु. हप्ता देण्यास सांगितले. नाहीतर फिर्यादींना त्या ठिकाणी धंदा करू देणार नाही अशी धमकी दिली. परंतु फिर्यादींकडे पैसे नसल्याने त्यांनी हप्ता देण्यास नकार दिला. त्यामुळे आरोपींनी ‘मै यहां का भाई हुं. मुझे हप्ता नहीं देता, तुझे धंदा नहीं करने का क्या’ असे म्हणून फिर्यादींना शिवीगाळ करून हाताने मारहाण केली. तसेच दुकानातील इलेक्ट्रिक वजन काट्यावरील भांडे फिर्यादींच्या डोक्यात फेकून मारले. दुकानाबाहेर पडलेले दगड उचलून फिर्यादींच्या दिशेने फेकले. परंतु फिर्यादींनी दुकानाचे शटर बंद केल्याने ते शटरवर लागले. आरोपींनी बाहेरून शटरवर लाथा मारून ‘हम यहां के भाई है, हमको हप्ता नहीं दिया तो हम किसीको छोडेंगे नहीं’ असे म्हणून परिसरात दहशत निर्माण केली.
गावगुंडांचा बंदोबस्त करा
गावगुंडांच्या वाढत्या त्रासाला स्थानिक नागरिक वैतागले आहेत. सतत होणार गुंडांचा त्रास कमी करण्यासाठी पोलीस प्रशासनाने योग्य टी कारवाई करावी अशी मागणी स्थानिकांनी केली आहे. याबरोबर गाव गुंड त्रास देत असल्यास न घाबरता त्याची तक्रार पोलिसात करावी असे आवाहनही पोलिसांनी केले आहे.
Assembly winter session : अधिवेशनाआधी मुख्यमंत्र्यांविना चहापान, अधिवेशन वादळी ठरण्याची शक्यता