बारामती (पुणे) : बारामती तालुक्यात एक दुखद घटना घडली आहे. शेतात काम सुरु असताना अचानक पाऊस सुरु झाला. पावसादरम्याना विजांचा कडकडाट सुरु झाला. यावेळी शेतात काम करणाऱ्या कुणालाही कल्पना नव्हती की त्यांच्यासोबत काय होईल. पाऊस सुरु असताना अचानक काळाने घाला घातला. तीन मजुरांच्या अंगावर वीज कोसळली. यामध्ये दोन जणांता जागीच मृत्यू झाला. तर एकावर रुग्णालयात उपचार सुरु आहेत.
संबंधित घटना ही बारामती तालुक्यातील कुरणेवाडी गावात घडलीय. बारामती तालुक्यात आज (20 सप्टेंबर) अधूनमधून पावसाची संततधार सुरु होती. पण या पावसादरम्यान कोणतीही अनपेक्षित घटना घडेल, असा कुणालाही अंदाज नव्हता. त्यामुळे कुरणेवाडी गावातील गावकरी आपल्या नेहमीच्या नित्यनियमाप्रमाणे शेतात कामासाठी गेले होते. शेतात शेतमजूरही काम करत होते. शेतात काम सुरु असाताना पावसाची संततधार सुरु होती आणि अचानक तीन मजुरांवर वीज कोसळली. यावेळी परिसरात खळबळ उडाली.
वीज अंगावर कोसळल्याने तीनही मजूर जागेवर कोसळले. त्यांना नेमकं काय झाले ते पाहण्यासाठी शेतातील इतर शेतमजूर त्यांच्याजवळ धावले. तीनही जणांना तातडीने रुग्णालयात घेऊन जाण्याची व्यवस्था करण्यात आली. पण तोपर्यंत उशिर झाला होता. बाळासो घोरपडे आणि संगीता घोरपडे यांचा जागीच मृत्यू झाला होता. तर पद्मिमीनी घोरपडे यांचा श्वास सुरु होता. त्यांना बारामती तालुक्यातील एका खासगी रुग्णालयात दाखल करण्यात आलं. त्यांची प्रकृतीदेखील गंभीर आहे. त्यांच्यावर सध्या उपचार सुरु आहेत.
या घटनेमुळे कुरणेवाडी गावात शांतता पसरली आहे. गावकरी हळहळ व्यक्त करत आहेत. प्रत्येकाच्या मनामध्ये या घटनेमुळे एक भीती निर्माण झालीय. मृतकांच्या नातेवाईकांचा प्रचंड आक्रोश सुरु आहे. त्यांची अवस्था बघून गावातील इतर नागरिकांच्याही डोळ्यांमध्ये पाणी आलं. संपूर्ण गाव शोकाकूळ झालं आहे. गावकऱ्यांनी मृतकांच्या आत्म्यास शांत मिळो, अशी प्रार्थना केलीय.
दरम्यान, राज्यात पावसासाठी पोषक वातावरण निर्माण झालंय. आजपासून पुढचे तीन ते चार दिवस विविध भागांत पावसाच्या सरी कोसळण्याची शक्यता हवामान विभागाकडून व्यक्त करण्यात आली आहे. ढगांच्या गडगडाटासह आणि विजांच्या कडकडाटासह मुसळधार ते अतिमुसळधार पावसाची शक्यता वर्तविण्यात आलीय. बंगालच्या उपसागरात निर्माण झालेल्या सिस्टिम मुळे व त्याच्या संभवित पुढच्या 2,3 दिवसात आतल्या दिशेने सरकण्याच्या शक्यतेमुळे राज्यात आजपासून 23 सप्टेंबरपर्यंत काही ठिकाणी विजांच्या गडगडाटासहीत तर काही ठिकाणी मुसळधार पावसाची शक्यता निर्माण झाल्याची माहिती हवामान तज्ज्ञ के. एस. होसाळीकर यांनी दिली आहे.
प्रादेशिक हवामान विभाग केंद्र, मुंबई येथून प्राप्त झालेल्या अंदाजानुसार पुढील आठवड्यात 20 आणि 21 सप्टेंबर रोजी मराठवाड्यातील काही जिल्ह्यात वीजेच्या गडगडाटासह पाऊस होण्याची शक्यता आहे. यापैकी 20 सप्टेंबर रोजी औरंगाबाद, जालना, परभणी, हिंगोली व नांदेड जिल्ह्यात वादळीवाऱ्यासह पाऊस होण्याची शक्यता आहे. तर 21 सप्टेंबर रोजी औरंगाबाद, जालना, परभणी, हिंगोली आणि बीडमध्येही तुरळक ठिकाणी वादळी वाऱ्यासह पाऊस बरसण्याची शक्यता वर्तवण्यात आली आहे, ही माहिती, डॉ. के.के . डाखोरे, मुख्य प्रकल्प समन्वयक, ग्रामीण कृषी मौसम सेवा,वसंतराव नाईक मराठवाडा कृषी विद्यापीठ, परभणी यांच्याकडून मिळाली आहे.
हेही वाचा :
चिमुकले शेततळ्याजवळ खेळत होते, खेळता-खेळता पाण्यात गेले, तिघांचा दुर्देवी अंत, अहमदनगर हळहळलं