पुणे | 27 ऑक्टोंबर 2023 : पुणे येथील ससून रुग्णालयात राहून ललित पाटील ड्रग्स रॅकेट चालवत होता. पुणे पोलिसांच्या क्राईम ब्रॅचने हे प्रकरण उघड केले. त्यानंतर रुग्णालयात पोलीस बंदोबस्त असताना ललित पाटील फरार झाला होता. या प्रकरणात पुणे पोलिसांवर चौफेर टीका झाल्यानंतर धडक कारवाई सुरु झाली. बुधवारी पुणे पोलिसांनी ललित पाटील याला मदत केल्याप्रकरणी उद्योगपती आणि रोजरी एजुकेशन ग्रुपचे संचालक विनय आरान्हा याला अटक केली होती. विनय आरान्हा यांनी ललित पाटील याला त्याच्या मैत्रिणीसाठी फ्लॅट उपलब्ध करुन दिल्याची माहिती तपासातून समोर आली आहे. रुग्णालयात असताना त्या फ्लॅटमध्ये जाऊन ललित पाटील तिच्या मैत्रिणीस भेटत होता.
ललित पाटील याला अटक झाल्यानंतर त्याला मदत करणारे एकएक जण समोर येऊ लागले आहेत. रुग्णालयात असलेले उद्योगपती विनय आरान्हा यांनी त्याला मदत केल्याचे समोर आले आहे. विनय आरान्हा यांचा पुणे येथील मध्यवर्ती भागात फ्लॅट आहे. तो फ्लॅट ललित पाटील याला त्यांनी उपलब्ध करुन दिला होता. ललित पाटील रुग्णालयात असताना मैत्रिणीस भेटण्यासाठी त्या ठिकाणी जात होता. ३० सप्टेंबर रोजी ललित पाटील मैत्रिणीसोबत त्या फ्लॅटवर होता, ही माहिती देखील समोर आली आहे.
ललित पाटील रुग्णालयातून फरार झाल्यानंतर त्याला विनय आरन्हा याचा वाहनचालकाने मदत केली होती. आरन्हा यांच्या सांगण्यावरुन त्यांचा वाहन चालक दत्ता डोके याने मदत केली. डोके याने ललित पाटील याला रावेत या गावापर्यंत सोडले. तसेच एटीएममधून काढून दहा हजार रुपये दिले होते. ते पैसे घेऊन ललित पाटील पुढील प्रवासासाठी निघाला होता. हे प्रकरण उघड झाल्यानंतर विनय आरन्हा यांना बुधवारी अटक करण्यात आली. विनय आरन्हा ईडीने दाखल केलेल्या एका गुन्हा प्रकरणात कारागृहात आहेत. विनय आरन्हा यांना पुणे पोलिसांनी कस्टडीत घेतले असून चौकशीतून अजून माहिती समोर येणार आहे.