पुणे : या जगात कुणाचंच कुणी नाही. आपले आई-वडील, सख्खा भाऊ असे ज्यांच्यासोबत रक्ताचे नाते आहे हीच माणसं आपल्याला अडचणीच्या काळात मदतीसाठी पुढे येतात, असं म्हणतात. पण पुण्याच्या हडपसर परिसरात तर सख्ख्या भावाच्या नात्याला काळीमा फासणारी घटना समोर आली आहे. लहान भाऊ दारुसाठी पैसे मागतो, त्रास देतो म्हणून मोठ्या भावाने आपल्या लहान भावाला पंख्याच्या पात्याने गळा कापून संपवलं. संबंधित घटना उघड झाल्यानंतर परिसरात एकच खळबळ उडाली आहे.
बाबू उर्फ प्रदीप शिवाजी गवळी असं खून झालेल्या 23 वर्षीय तरुणाचे नाव आहे. मनोज शिवाजी गवळी (वय 28) असे अटक केलेल्याचे मोठ्या भावाचे नाव आहे. याप्रकरणी नितीन श्रीरंग बनसोडे (वय 32) यांनी हडपसर पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, प्रदीप आणि मनोज हे दोघेही सख्खे भाऊ आहेत. दोघेही हडपसरमधील 15 नंबर परिसरात खोली भाड्याने घेऊन एकत्र राहात होते. प्रदीप हा रिक्षा चालविण्याचे काम करीत होता. तर मनोज हा खासगी ट्रॅव्हल्स बससाठी प्रवासी शोधण्याचे काम करायचा.
मनोजच्या पत्नीला प्रदीपचे घरी राहणे आवडत नव्हते. त्यावरुन मनोज आणि त्याच्या पत्नीमध्ये सातत्याने वाद सुरु होते. सातत्याने होणाऱ्या वादाला कंटाळून मनोजची पत्नी गावाला निघून गेली होती. प्रदीपला दारुचे व्यसन होते. त्यातूनच तो दारु पिण्यासाठी मनोजकडे सतत पैशांची मागणी करीत होता. प्रदीपचे दारुचे व्यसन आणि बाहेरख्याली वर्तनामुळे मनोज कंटाळला होता. त्यामुळे त्याने थेट आपल्या सख्या लहान भावाचा काटा काढण्याचं ठरवलं.
प्रदीप रात्री खोलीमध्ये झोपला होता. त्यावेळी मनोजने मध्यरात्रीच्या सुमारास घरातील पंख्याच्या पात्याने प्रदीपचा गळा कापून त्याचा खून केला. ही घटना मंगळवारी (19 ऑक्टोबर) उघडकीस आली. त्यानंतर हडपसर पोलिसांनी घटनास्थळावर जाऊन मृतदेह ताब्यात घेतला. प्रदीपचा मृतदेह शवविच्छेदनासाठी ससून रुग्णालयात पाठविण्यात आला. त्यानंतर पोलिसांनी मनोजला अटक केली.
दुसरीकडे वर्ध्यात हत्येची धक्कादायक घटना समोर आली आहे. उसनवारीने दिलेले पैसे परत न दिल्याने युवकाची चाकूने भोसकून हत्या करण्यात आली. ही घटना वर्धा जिल्ह्यातील इत्वारा बाजार भागातील मच्छी मार्केट परिसरात सोमवारी रात्रीच्या सुमारास घडली. वर्धा शहर पोलिसांनी आरोपीस ताब्यात घेतले असून चाकू जप्त केल्याची माहिती दिली. ही हत्या अवघ्या 500 रुपयांसाठी झाली असल्याची माहिती आहे.
रुपेश खिल्लारे (रा. इतवारा) असे मयत तरुणाचे नाव आहे. रुपेशने आरोपी निलेश वालमांढरे याच्याकडून उसनवारीने पैसे घेतले होते. मात्र पैशाची परतफेड न केल्याने निलेशने रुपेशकडे धोशा लावला होता. यातून दोघांमध्ये वादावादी झाली. भांडण इतकं वाढलं की निलेशने रुपेशच्या पोटावर चाकूने सपासप वार करुन हत्या केली. निलेशला शहर पोलिसांनी अटक केल्याची विश्वसनीय माहिती असून पुढील तपास पोलीस करत आहेत.
हेही वाचा :
मुंबईत ‘सेक्स टुरिझम रॅकेट’चा धक्कादायक प्रकार उघडकीस; दोन महिला दलालांना अटक