पुण्यातील हिट अँड रन प्रकरणात सरकारवर दबाव वाढला आहे. आरोपीचा बचाव करण्याचा प्रयत्न होतोय, असा आरोप होतोय. आरोपी एका बड्या व्यावसायिकाचा मुलगा आहे. शनिवारी रात्री पुण्यात कोरेगाव पार्कमधील कल्याणीनगर येथे हा भीषण अपघात झाला. भरधाव वेगात पोर्शे कार चालवणाऱ्या आरोपीने एका दुचाकीला उडवलं. यात दुचाकीवरील अनीस दुधिया आणि अश्विनी कोस्टा या दोघांचा मृत्यू झाला. पुण्यातील सर्वच राजकीय पक्षांनी आरोपीविरोधात कठोर कारवाई करण्याची मागणी केली आहे. पुणे पोलिसांवर सुद्धा काही आरोप झाले. यावर पुणे पोलिस आयुक्त अमितेश कुमार यांनी पत्रकार परिषद घेऊन सर्व प्रश्नांची उत्तर दिली.
“आम्ही आरोपीवर 304 कलम लावलं होतं. अल्पवयीन म्हणून नव्हे तर प्रौढ आरोपी म्हणून खटला चालवावा अशी आम्ही न्यायालयाकडे विनंती केलीय. जिल्हा कोर्टात आम्ही अपील केलय. पूर्ण ताकदीने हा खटला लढणार. 304 हे अजामीनपात्र वॉरंट आहे. दुसऱ्याही कलमातंर्गत सेक्शन 75,77 मध्ये गुन्हा दाखल केलाय” अशी माहिती पुणे पोलीस आयुक्तांनी दिली. “वडील, पब मॅनेजमेंटसह पाच लोकांविरुद्ध गुन्हा दाखल केला. त्यापैकी तीन लोकांना रात्री अटक करण्यात आली. त्यांना आज कोर्टात हजर करु” असं अमितेश कुमार म्हणाले.
आरोपीने दारु पिल्याच स्पष्ट
“वडिलांना छत्रपती संभाजीनगरमधून ताब्यात घेण्यात आलय. त्यांना इथे आणल्यावर अटकेची कारवाई करु” असं पुणे पोलीस आयुक्तांनी म्हटलं आहे. “पुरावे गोळा करण्यासाठी विशेष तपास पथक नेमण्यात आलय. सीसीटीव्ही फुटेज, ऑनलाइन पेमेंट झालय त्याचा तपास करत आहोत” असं पुणे पोलिसांनी म्हटलय. दोन सीसीटीव्ही फुटेज समोर आलेत, त्यात अल्पवयीन आरोपी बारमध्ये बसून दारु पिताना दिसतोय, हे पुणे पोलिसांनी स्पष्ट केलं.
कुठला रिपोर्ट निगेटिव्ह आलाय का?
आरोपीचा कुठला रिपोर्ट निगेटिव्ह आलाय का? त्यावर कुठलाही रिपोर्ट निगेटिव्ह आलेले नाही असं पुणे पोलिसांनी सांगितलं. ब्लड रिपोर्ट घेण्यात आला असून खबरदारी म्हणून दोन ठिकाणी रक्ताचे नमुने पाठवण्यात आले आहेत, तो रिपोर्ट अजून यायचा बाकी आहे असं पोलिसांनी सांगितलं.
पुणे पोलिसांवर दबाव आहे का ?
पुणे पोलिसांवर दबाव आहे का ? या प्रश्नावर आयुक्त म्हणाले की, “आमच्यावर कोणाचाही दबाव नाही. पहिल्या दिवसापासून आम्ही कायदेशीर बाबींची पूतर्ता करत आहोत. पुणे पोलिसांनी कठोर पावल उचलली आहेत, त्यापेक्षाही अजून कठोर कारवाई कोणी सुचवत असेल, तर आम्ही तयार आहोत” ‘मी कुठल्याही पॅनलसमोर चर्चा करायला तयार आहे’ असं पुणे पोलीस आयुक्त अमितेश कुमार म्हणाले.