पुणे : घोटाळे आणि फसवणुकीच्या घटनांमध्ये भारतात दरदिवशी चिंताजनक वाढ होत आहे. लोकांनी मेहनतीने कमावलेला पैसा फसवणुकीमध्ये गमावल्याच्या बातम्या आपण रोज वाचत आहोत. सध्याच्या ऑनलाइन विश्वात ओळख नसलेल्या माणसांवर डोळेझाकून विश्वास ठेवायचा नाही, तसच कुठेही पैसा गुंतवण्याआधी पार्श्वभूमी तपासायची हे फसवणूक टाळण्याचे सोपे मार्ग आहेत. अनोळखी व्यक्तीने दिलेल्या आर्थिक सल्ल्यावर तुम्ही विश्वास ठेवता, त्यावेळी फसवणूक होण्याचा धोका जास्त वाढतो.
पुण्यात आयटी क्षेत्रात काम करणाऱ्या एका तरुणाची अशीच तब्बल 92 लाख रुपयांना फसवणूक झाली आहे. त्याने ज्या मुलीवर विश्वास ठेवला, ती घोटाळेबाज निघाली. महत्वाच म्हणजे त्याची या मुलीबरोबर मॅट्रिमोनियल साइटवरुन ओळख झाली होती.
काय लक्षात घेतलं पाहिजे?
जीवनसाथी शोधण्यासाठी अनेक जण मॅट्रिमोनियल साइटचा वापर करतात. या साइट्सवरुन तुम्ही अनोळखी व्यक्तीशी संवाद साधता हे लक्षात घेतलं पाहिजे. तुमची त्याच्यााशी दोन-चारदा भेट होत नाही, त्यांची पार्श्वभूमी चेक करत नाही, तो पर्यंत समोरच्या माणसावर विश्वास ठेऊ शकत नाही.
तिने तरुणाला कसं तयार केलं?
पुण्यात मॅट्रिमोनियल साइटवरुन ओळख झालेल्या एका तरुणाची तब्ब्ल 91.75 लाख रुपयांना फसवणूक झाली आहे. हा तरुण आयटी क्षेत्रात काम करतो. द इंडियन एक्सप्रेसच्या वृत्तानुसार, त्याची तरुणी बरोबर यावर्षी फेब्रुवारी महिन्यात ऑनलाइन ओळख झाली होती. तिच्यासोबत एकदिवस आपलं लग्न होणार या आशेवर तो तरुण होता. संबंधित तरुणीने तरुणाला 91.75 लाख रुपयांची गुंतवणूक करण्यासाठी राजी केलं. इंडिया टुडेने हे वृत्त दिलय.
किती लाखाच कर्ज उचललं?
मॅट्रिमोनियल साइटवरुन दोघांची ओळख झाल्यानंतर तरुणीने लग्न करण्याच तरुणाला आश्वासन दिलं होतं. रोज फोनरुन त्यांच्यात बोलणं सुरु झालं. तरुणीने ब्लेसकॉइनमध्ये गुंतवणूक करण्यासाठी तरुणाला राजी केलं. लग्नानंतर चांगलं भविष्य हवं, असं तिने कारण दिलं. त्याने तरुणीवर विश्वास ठेऊन वेगवेगळ्या बँका, लोन App वरुन तब्बल 71 लाख रुपयांच कर्ज काढलं.
फसवणूक झाल्याच कधी समजलं?
महिलेच्या सूचनांवरुन त्याने वेगवेगळ्या बँक खात्यात 86 लाख रुपये ट्रा्न्सफर केले. ब्लेसकॉइनमध्ये या पैशांची गुंतवणूक होतेय, असं त्याला वाटत होतं. त्याला काहीच परतावा मिळाला नाही. त्यानंतर त्याने तरुणीकडे विचारणा केली. तिच्या सूचनेवरुन पुन्हा 10 लाख गुंतवले. पण रिटर्न येत नव्हते. त्यावेळी त्याला आपली फसवणूक झाल्याच लक्षात आलं. संबंधित तरुण देहू रोड आदर्श नगर येथे राहतो. देहू रोड पोलीस ठाण्यात या बद्दल तक्रार दाखल झाली आहे.