नाशिक : पुणे शहरात धुमाकुळ माजवून दहशत निर्माण करणाऱ्या ‘कोयता गँग’च्या मुसक्या आवळण्यात आल्याचा दावा पुणे पोलिसांनी केला. मात्र, या गँगची दहशत काही कमी होताना दिसत नाही. दिवसेंदिवस कोयता गॅंग पुन्हा डोके वर काढतच आहे. पोलिसांच्या साऱ्या योजना कोयता गँगने फेल ठरवत पुणेकरांना वेठीस धरले आहे.अशातच आता पुण्यातील कोयता गॅंगने नाशिकमध्ये आपले हात पाय पसरण्यास सुरवात केलीय. विहितगाव, देवळालीगाव, रेल्वे स्थानक, सुभाषरोड, वालदेवी काठावरील स्मशानभूमी आदी भागात कोयता गँगने दहशत माजविली आहे. या गँगच्या कारवाई रोखण्यासाठी पोलीस प्रयत्न करत असतानाच कोयता गँगने सिडको परिसरात धुमाकूळ घातला आहे.
पुण्यातील मुख्य भागात कोयता गँग चांगलीच सक्रीय होती. पण, पोलिसांनी शहर आणि उपनगरात कोयत्यासारखे धारदार शस्त्र घेऊन दहशत माजवणाऱ्यांच्या मुसक्या आवळल्याने हैराण पुणेकरांना दिलासा दिला. मात्र, हीच गॅंग आता नाशिकमध्ये धुमाकूळ घालत असल्याने नाशिक पोलिसांसमोर नवी डोकेदुखी निर्माण झाली आहे.
नाशिकच्या सिडको परिसरातील पवननगर येथे दोन दुचाकी वाहनांवर पाच ते सात टवाळखोरांनी हल्ला केला. या टवाळखोरांनी त्यानंतर येथील काही वाहनांची तोडफोड करून दहशत माजविण्याचा प्रयत्न केला. हातात कोयता आणि लाकडी दांडूके घेऊन त्या टवाळखोरांनी 15 ते 20 दुचाकी, पाच रिक्षा आणि काही चार चाकी वाहनांची तोडफोड केली.
या संपूर्ण घटनेचे दृश्य सीसीटिव्ही कॅमेऱ्यात कैद झाले आहे. या घटनेमुळे परिसरातील नागरिकांमध्ये भीतीचे वातावरण निर्माण झाले आहे. गेल्या काही दिवसांपासून नाशिकच्या अंबड आणि सिडको परिसरात गुन्हेगारी घटनांमध्ये वाढ झालीय. पवननगर मधील सप्तशृंगी चौक, स्वामीनारायण चौक या भागात टवाळखोरांनी दहशत माजविण्याचा प्रयत्न केला.
नाशिकरोड आणि उपनगर पोलिस ठाण्यांच्या हद्दीत कोयता गँगने धुमाकूळ घातला आहे. काही दिवसांपूर्वी या गँगने रेल्वे स्थानकाजवळ संजय खांडगीर या व्यक्तीला जखमी करून लुटले. तर, मुक्तिधाम परिसरातील सूरज कलेक्शनमध्ये घुसून गल्ल्यातील रोकड घेऊन पसार झाले होते. अनेक घटनांमुळे नाशिककर दहशतीच्या वातावरणात रहात असून ही वाढती गुन्हेगारी नियंत्रित करण्याचे मोठे आव्हान पोलीस यंत्रणेसमोर आहे.