पुणे : लोकप्रिय फूड डीलिव्हरी एपच्या माध्यमातून अंमलीपदार्थांची विक्री करणाऱ्या एका टोळीचा छडा पुणे पोलिसांनी लावला आहे. या फूड डीलिव्हरी एपचा वापर ही टोळी अंमलीपदार्थ पुरविण्यासाठी करीत असल्याने अगदी रात्री उशीरा देखील ते अंमलीपदार्थांनी डीलिव्हरी आरामात करीत होते अशी माहीती उघडकीस आली आहे. या प्रकरणी एमबीएची तयारी करणाऱ्या उच्च शिक्षितांच्या पाच जणांच्या टोळी पुणे आणि आजूबाजूच्या परीसरातून पोलिसांनी अटक केली आहे.
पुणे पोलिसांच्या क्राईम ब्रॅंचच्या अॅण्टी नार्कोटीक्स सेल या प्रकरणात कोथरूड येथून रोहन दीपक गवई ( 24 ) बानेर येथून मूळच्या सातारा येथील रहीवासी असलेला सुशांत काशीनाथ गायकवाड (36 ) याला पिंपल सौदागर येथून धीरज दीपक लालवाणी ( 24 ) सनसिटी रोड येथून दीपक लक्ष्मण गेहलोत ( 25) आणि वाकड येथून ओमकार रमेश पाटील (25) यांना अटक केली आहे. त्यांच्याकडून अंमलीपदार्थ एलएसडीचे 17 ग्रॅमचे तुकडे आणि इतर अवैध वस्तूंसह एकूण 53.35 लाखांचा ऐवज जप्त केला आहे.
कोथरूड आणि आजूबाजूच्या परीसरात एलएसडी ऑनलाईन विकले जात असल्याची गुप्त बातमी पोलिस शिपाई विशाल शिंदे यांना मिळाली होती. त्यांनी सापळा रचून रोहन गवई याला 90,000 किंमतीच्या एलएसडीसह अटक केली. त्याच्या चौकशीतून इतर साथीदारांना एकामागोमाग अटक झाली. त्यांना बाणेर, सिंहगड रोड, पिंपळ सौदागर आणि वाकड येथून अटक झाली.
रोहन गवई हा एमबीएच्या द्वितीय वर्षाला असून सुशांत गायकवाड इंजिनिअर आहे. त्याचे इतर साथीदारही उच्च शिक्षित आहेत. त्यांना पार्टी आणि लक्झरी लाईफ जगण्यासाठी झटपट पैसा हवा होता म्हणून त्यांनी हा गुन्हा केल्याची कबूली दिली आहे. लालवाणी, गेहलोत आणि पाटील हे तिघे या टोळीचे मास्टरमाईंड असून इतर त्यांना मदत करीत होते. ते व्हॉट्सअप वरुन फूड डीलीव्हरी एपआधारे ऑर्डर बुक करायचे ऑर्डर मिळाल्यानंतर ते पाकीटे डीलिव्हरी बॉयना द्यायचे. त्यांना त्या पाकिटात काय आहे हे माहीती नसायचे.