Allu Arjun Arrest : मोठी बातमी, अल्लू अर्जुनला अंतरिम जामीन मंजूर

| Updated on: Dec 13, 2024 | 5:45 PM

Allu Arjun Arrest : ‘पुष्पा 2’ चित्रपटाच्या स्क्रिनिंग दरम्यान झालेल्या चेंगराचेंगरी प्रकरणात अल्लू अर्जुनला आज अटक करण्यात आली. अल्लू अर्जुनला मेडीकल केल्यानंतर कोर्टात हजर करण्यात आलं. त्याला कोर्टाने न्यायालयीन कोठडी सुनावली होती.

Allu Arjun Arrest : मोठी बातमी, अल्लू अर्जुनला अंतरिम जामीन मंजूर
Image Credit source: Instagram
Follow us on

साऊथ सुपरस्टार आणि ‘पुष्पा 2’ चित्रपटात प्रमुख भूमिकेत असलेल्या अल्लू अर्जुनला 14 दिवसांची न्यायालयीन कोठडी सुनावण्यात आली होती. पण त्याला आता अंतरिम जामीन मंजूर झाला आहे. अर्जुनला संध्या थिएटरमधील चेंगराचेंगरीप्रकरणी हैदराबादमधील चिक्कडपल्ली पोलिसांनी आज अटक केली होती. अल्लू अर्जुन संध्या थिएटरमध्ये आला होता, त्यावेळी त्याची एक झलक पाहण्यासाठी चाहत्यांनी तुंबड गर्दी केली होती. यावेळी झालेल्या चेंगराचेंगरीत एका 35 वर्षीय महिलेचा मृत्यू झाला होता. अल्लू अर्जुनला अटक केल्यानंतर गांधी हॉस्पिटलमध्ये त्याची वैद्यकीय तपासणी करण्यात आली. नंतर त्याला नामपल्ली कोर्टात हजर करण्यात आलं.

अल्लू अर्जुन पुष्पा 2 चित्रपटाच्या स्क्रीनिंगवेळी थिएटरमध्ये आला, त्यावेळी एकच गोंधळ, धावपळ सुरु झाली. त्यात एका महिलेचा मृत्यू झाला. तिच्यासोबत आलेला मुलगा गंभीररित्या जखमी झाला. त्याला रुग्णालयात दाखल करण्यात आलं. त्यानंतर तक्रारीच्या आधारावर पोलिसांनी अल्लू अर्जुन विरोधात गुन्हा नोंदवला व नंतर त्याला अटक केली.

तेलंगणचे मुख्यमंत्री काय म्हणाले?

हा घटनाक्रम पाहता पोलिसांनी कुठलीही अप्रिय घटना रोखण्यासाठी खबरदारी म्हणून पावलं उचलली होती. अल्लू अर्जुनशी संबंधित प्रकरणात तेलंगणच्या मुख्यमंत्र्यांनी प्रतिक्रिया दिली आहे. ते म्हणाले कायद्यासमोर सर्व समान आहेत. या प्रकरणात कायदा आपलं काम करेल. यात कोणाचाही हस्तक्षेप नसेल.

विरोधी पक्षाच्या नेत्यांनी काय म्हटलं?

विरोधी पक्षाच्या नेत्यांनी अल्लू अर्जुनच्या अटकेचा निषेध केला आहे. अल्लू अर्जुनबद्दल सरकारची भूमिका योग्य नाही असं बीआरएसचे कार्यकारी अध्यक्ष केटीआर म्हणाले. अल्लू अर्जुनला सामान्य गुन्हेगार समजणं योग्य नाही, असं ते म्हणाले. केंद्रीय मंत्री बंदी संजय यांनी अल्लू अर्जुनच्या अटकेसाठी सरकारला जबाबदार ठरवलं आहे. चेंगराचेंगरीत एका महिलेचा मृत्यू होणं दुर्देवी आहे. त्यांनी या गोंधळसाठी सरकारला जबाबदार धरलं.

अल्लू अर्जुनची हाय कोर्टात याचिका

अल्लू अर्जुनने संध्या थिएटर चेंगराचेंगरी प्रकरणात हाय कोर्टाचा दरवाजा ठोठावला आहे. अभिनेत्याने हाय कोर्टात याचिका दाखल करुन तात्काळ सुनावणीची मागणी करुन पोलिसांनी दाखल केलेला एफआयआर रद्द करण्याची मागणी केलीय. न्यायालयाने अल्लू अर्जुनची याचिका स्वीकारली आहे.