जयपूर : राजस्थानमधील जालोर जिल्ह्यात अंगाचा थरकाप उडवणारी हत्येची घटना समोर आली आहे. जालोरमधील आहोर परिसरात एकतर्फी प्रेमातून सैरभैर झालेल्या एका तरुणाने महिलेवर कुऱ्हाडीने वार करून तिचा खून केला. महिलेचा मृत्यू होईपर्यंत त्याने तिच्यावर कुऱ्हाडीने हल्ला सुरुच ठेवला होता. जोपर्यंत महिलेचा श्वास सुरु होता, तोपर्यंत आरोपी ‘मी तुला मारुन टाकीन’ असे ओरडत राहिला. तरुणाने महिलेचा खांदा, मान आणि शरीराच्या इतर भागांवर इतके वार केले, की तिथली जमीन रक्तबंबाळ झाली. आरोपी तरुणाच्या मानगुटीवर जणू सैतान स्वार झाला होता. कारण मृत्यूनंतरही तो महिलेच्या मृतदेहाला कवटाळून बसला होता. पोलिसांनी आरोपीला अटक केली आहे.
आरोपीचे एकतर्फी प्रेम
मिळालेल्या माहितीनुसार, शांतीदेवी यांना दोन मुलं आहेत. ती आपल्या सासरच्या मंडळींसोबत राहायची. महिलेचा पती शांतीलाल महाराष्ट्रात काम करतो. मनरेगाच्या कामासाठी शांतीदेवी रविवारी जोजावर नाडी येथे गेल्या होत्या. यावेळी गावात राहणारा 21 वर्षीय गणेश मीणा तिथे आला. त्याने शांती देवींना सांगितले की त्याचे तिच्यावर प्रेम आहे.
कुऱ्हाडीने सपासप वार
शांतीदेवीने मात्र गणेशला नकार दिला. त्यामुळे रागाच्या भरात गणेशने तिच्यावर कुऱ्हाडीने सपासप वार केले. वेडेपणाच्या भरात आरोपीने कुऱ्हाड फिरवली आणि आज तुझा जीव घेऊनच थांबेन, असं ओरडत होता. आरोपीने आरडाओरडा करत महिलेची मान धडावेगळी केली. महिलेचा मृत्यू होईपर्यंत त्याने हल्ला करणे थांबवले नाही.
हत्येनंतर मृतदेहाला कवटाळून बसला
या विचित्र हल्ल्यात शांती देवी यांचा जागीच मृत्यू झाला. इतर मनरेगा कामगारांनीही त्यांना वाचवण्याचा प्रयत्न केला. मात्र गणेशने त्यांनाही जीवे मारण्याची धमकी दिली. त्यामुळे भीतीने सर्वजण माघारी फिरले. महिलेच्या मृत्यूनंतरही आरोपीचा धुमाकूळ संपत नव्हता. हत्या केल्यानंतर तो महिलेच्या मृतदेहाला चिकटून राहिला. माहिती मिळताच पोलीस घटनास्थळी पोहोचले. त्यानंतरही आरोपी मृतदेह सोडण्यास तयार नव्हता. पोलिसांनी त्याला बळजबरीने पकडून ताब्यात घेतले आणि मृतदेह रुग्णालयात नेला.
पतीने समज देऊनही बधला नाही
पोलिसांनी सांगितले की, या प्रकरणातील आरोपी गणेश मीणा हा थांवला गावातील रहिवासी आहे. आरोपीचे महिलेवर एकतर्फी प्रेम होते. अनेक महिन्यांपासून पाठलाग करून तो शांतीदेवीला त्रास देत होता. शांतीदेवी यांनी पती शांतीलाल चौधरी यांनाही याबाबत सांगितले होते. पतीने आरोपी गणेश मीणाला समजावलेही होते, मात्र त्याला समज आली नाही आणि शांतीदेवीला जीव गमवावा लागला.
संबंधित बातम्या :
चौथ्या मजल्यावरुन उडी घेत विवाहितेची आत्महत्या, आई म्हणते, तिच्या दीर-नवऱ्याकडून हत्या
चायनिजच्या गाडीवर गल्ल्यावरुन राडा, पाच जणांची बेदम मारहाण, भिवंडीत तरुणाचा मृत्यू