जयपूर : राजस्थानच्या भरतपूर जिल्ह्यात 14 वर्षीय मुलावर सामूहिक बलात्कार केल्याप्रकरणी एका न्यायाधीशाला निलंबित करण्यात आले आहे. आरोपी जजसह आणखी दोघा जणांवर गँगरेप प्रकरणी गुन्हा दाखल करण्यात आला आहे. तसेच, मुलाला धमकावल्याबद्दल लाचलुचपत प्रतिबंधक विभागाच्या (ACB) अधिकाऱ्याला निलंबित करण्यात आले.
राजस्थान उच्च न्यायालयाच्या आदेशानुसार, विशेष न्यायाधीश जितेंद्र सिंह गोलिया यांना प्राथमिक चौकशी आणि विचारविनिमय विभागीय चौकशी बाकी असताना तात्काळ प्रभावाने निलंबित करण्यात आले. ‘इंडियन एक्स्प्रेस’ या वृत्तपत्राच्या वेबसाईटवर यासंबंधी बातमी देण्यात आली आहे.
काय आहे प्रकरण?
लाचलुचपत प्रतिबंधक विभागाशी (एसीबी) संबंधित प्रकरणे हाताळणारे न्यायाधीश आणि इतर दोन व्यक्ती गेल्या एक महिन्यापासून आपल्या मुलाला अंमली पदार्थ पाजून लैंगिक अत्याचार करत आहेत, असा आरोप पीडित मुलाच्या आईने तिच्या तक्रारीत केला आहे.
पीडित मुलाला धमकी
या घटनेविषयी तोंड उघडल्यास गंभीर परिणाम भोगावे लागतील अशी धमकी न्यायाधीश गोलिया आणि इतर दोन आरोपींनी दिली, असेही तिने तक्रारीत म्हटले आहे. न्यायाधीशांचे स्टेनोग्राफर (लघुलेखक) अंशुल सोनी आणि न्यायाधीशांचा दुसरा कर्मचारी राहुल कटारा अशी अन्य आरोपींची नावे आहेत.
“फिर्यादीच्या आधारे, न्यायाधीश जितेंद्र गोलिया आणि इतर दोघांविरुद्ध POCSO कायद्याच्या अंतर्गत कलमांखाली बलात्कार आणि इतर आरोपांबद्दल एफआयआर नोंदवण्यात आला आहे. या प्रकरणाचा तपास वरिष्ठ अधिकाऱ्यांकडे सोपवण्यात आला आहे,” अशी माहिती मथुरा गेटचे एसएचओ राम नाथ यांनी दिली.
मैत्री करुन जजकडून अत्याचार
पोलिसांनी सांगितले की, सोनी आणि कटारा या दोघांसह एसीबीचे सर्कल अधिकारी परमेश्वर लाल यादव यांनी मुलाला जीवे मारण्याची धमकी दिल्याचा आरोप पीडित मुलाच्या कुटुंबीयांनी केला आहे. या घटनेनंतर यादव यांना निलंबित करण्यात आले आहे. डिस्ट्रिक्ट क्लब कंपनी बाग येथे पीडित मुलगा टेनिस खेळायला जायचा, तिथे न्यायाधीशांनी त्याच्याशी मैत्री केल्याची माहिती आहे.
संबंधित बातम्या :
घरातील तिघांनी आधी उंदिर मारायचं औषध घेतलं, नंतर पोलिसांना फोन, पण जे नको घडायला होतं ते घडलंच
सहा वर्षांच्या चिमुकलीचा अत्याचार करुन खून, मृतदेह झुडपात फेकला, कोल्हापुरातील संतापजनक घटना
‘भाईचा बड्डे’ जेलमध्ये, येरवडा कारागृहातील गुन्हेगाराच्या सेलिब्रेशनसाठी जमलेल्या पंटरना बेड्या