सध्या एक व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल होतोय. माणुसकीला लाज वाटेल असा हा व्हिडिओ आहे. या व्हिडिओमध्ये एक युवकाने पत्नीला रश्शीने बाईकला बांधल्याच दिसतय. तो तिला फरफटत नेतोय. हे प्रकरण आत्ताच नाहीय. एक महिन्यापूर्वीची नाहरसिंह पुरामधील ही घटना आहे. आता सोशल मीडियावर हा व्हिडिओ व्हायरल झाला. त्यानंतर पांचौडी पोलिसांनी आरोपीला अटक केली. राजस्थानच्या नागौर जिल्ह्यातील ही घटना आहे. आरोपीची पीडित पत्नी जैसलमेरला बहिणीच्या घरी आहे.
पोलिसांनी आरोपीची ओळख पटवली असून त्याचं नाव प्रेमराम मेघवाल आहे. काही दिवसांपूर्वी त्याने बिहार येथे गरीब कुटुंबात राहणाऱ्या मुलीसोबत लग्न केलं. त्यासाठी आरोपीने युवतीच्या आई-वडिलांना मोठी रक्कम दिली. एकप्रकारे त्याने मुलगी विकत घेऊन लग्न केलं. लग्नानंतर आरोपी पत्नीला नाहरसिंह पुरा येथे घेऊन आला. शेजाऱ्यांनी दिलेल्या माहितीनुसार, लग्नानंतर दोघांमध्ये भरपूर भांडण व्हायची. महिन्याभरापूर्वी सुद्धा त्यांच्यासमध्ये कुठल्यातरी विषयावरुन भांडण झालं होतं.
व्हिडिओ कोणी बनवला?
त्यावेळी आरोपीने पत्नीला रश्शीच्या सहाय्याने बाइकला बांधलं व फरफटत नेलं. योगायोगाने आरोपीच्याच एका मित्राने या घटनेचा व्हिडिओ बनवला. त्यानंतर आरोपीने पत्नीला घराबाहेर काढलं. ती जैसलमेर येथे राहणाऱ्या बहिणीकडे निघून गेली. दोन दिवसांपूर्वी आरोपी त्याच्या मित्रासोबत बसून दारु पित होता. त्यावेळी दोन मित्रांमध्ये भांडणं झाली. या भांडणातून मित्राने आरोपीचा व्हिडिओ सोशल मीडियावर अपलोड केला.
पत्नीशी संपर्क झाला का?
हा व्हिडिओ वेगात व्हायरल झाला. हा व्हिडिओ पाहून नागौरच्या पांचौडी पोलिसांनी तात्काळ पावल उचलली. आरोपीची ओळख पटवून सोमवारी त्याला अटक केली. या संबंधी अजून पत्नीची जबानी घेतलेली नाही. पोलिसांनी गुन्हा नोंदवून तपास सुरु केलाय. आरोपीची पत्नी आणि तिच्या नातेवाईकांशी संपर्क साधण्याचा प्रयत्न सुरु आहे.